शेतकऱ्यांचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा कार्यालयात सर्प सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 15:58 IST2021-12-04T15:56:43+5:302021-12-04T15:58:12+5:30
कार्यालयात सर्प सोडून महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांना सळोकीपळो करून सोडणार

शेतकऱ्यांचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा कार्यालयात सर्प सोडणार
गंगापूर : खंडित वीज पुरवठा सुरळीत न केल्यास येत्या सात तारखेला महावितरण कार्यालयात सर्प सोडण्याचा इशारा शेतकरी तथा प्रहार संघटनेचे कार्यकर्ते भाऊसाहेब शेळके यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याने हातात जिवंत सर्प घेऊन एका व्हिडीओद्वारे हा इशारा दिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तालुक्यात प्रतिवर्षी किमान तीनशे तास वीज विविध कारणाने खंडित होते. ग्राहक कायद्याअंतर्गत सेवा देण्यास खंड पडल्यास पन्नास रुपये प्रति तास ग्राहकास देणे बंधनकारक आहे. या नियमानुसार तालुक्यातील वीज ग्राहक शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रति शेतकरी येणे बाकी आहे. शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा सेवा हमी कायद्या अंतर्गत देणे बंधनकारक असतांना महावितरण कंपनी नियमांची पालमल्ली करत सक्तीने बील वसुली करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जोपर्यंत कृषीपंप धारक शेतकऱ्यांना त्रुटीचे पैसे मिळत नाही, तोपर्यंत जोडणी कट करू नये. तसेच खंडित जोडणी पूर्ववत करावी व शेतकऱ्यांची वसुली करून द्यावी अन्यथा येत्या सात तारखेपासून वीज वितरण कार्यालयात जिंवत सर्प सोडण्याचा इशारा शेतकरी भाऊसाहेब शेळके याने दिला. यामुळे महावितरण अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून वीज वितरण कंपनी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यालयात सर्प सोडून महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांना सळोकीपळो करून सोडणार असल्याची ठाम भूमिका शेळके यांनी घेतली आहे.