प्राचीन देवस्थान! प्रभू श्रीरामचंद्रांनी तयार केलेली ५ शिवलिंगे एकाच कुंडात

By प्रशांत तेलवाडकर | Published: January 18, 2024 05:53 PM2024-01-18T17:53:00+5:302024-01-18T17:55:29+5:30

तीर्थक्षेत्राचा दर्जा : वरुड-सुलतानपुरात ३ कोटी खर्च करून उभारतेय हेमाडपंती मंदिर

Five Shiv Lingas created by Lord Sri Ramachandra in a single tank; Ancient shrine near Chhatrapati Sambhajinagar | प्राचीन देवस्थान! प्रभू श्रीरामचंद्रांनी तयार केलेली ५ शिवलिंगे एकाच कुंडात

प्राचीन देवस्थान! प्रभू श्रीरामचंद्रांनी तयार केलेली ५ शिवलिंगे एकाच कुंडात

छत्रपती संभाजीनगर : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्वत्र राममय वातावरण तयार झाले आहे. पण तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल की, प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण हे वनवासात असताना छत्रपती संभाजीनगरमार्गे ते नाशिकला गेले होते. त्या काळात शहरापासून अवघ्या ७ कि.मी.वर असलेल्या वरूड, सुलतानपूर परिसरात त्यांनी ५ दिवस मुक्काम केला होता. येथील एका कुंडामध्ये एकाच ठिकाणी, एकाच दगडात श्रीराम व लक्ष्मण यांनी स्वत: पाच शिवलिंगे तयार केली होती, अशी आख्यायिका आहे. हे प्राचीन देवस्थान जुन्नेश्वर महादेव मंदिर भक्तप्रिय झाले आहे.

पाच फूट खोल कुंड
जुन्नेश्वर महादेव मंदिरात जमिनीपासून ५ फूट खोल कुंड आहे. १० बाय १० फुटांचे हे कुंड असून त्यात पाच शिवलिंगे आहेत. एकाच ठिकाणी, एकाच दगडात कोरलेली अशी पाच शिवलिंगे दुर्मिळच असावीत.

५ शिवलिंगे वेगवेगळ्या आकारांत
ही ५ शिवलिंगे आजूबाजूला असली तरी त्यांचा आकार सारखा नाही. सर्वात मोठे शिवलिंग ४ फूट लांबीचे आहे. दुसरे तीन फूट, तिसरे अडीच फूट, चौथे दोन फूट तर सर्वात लहान दीड फूट लांबीचे आहे.

तीर्थक्षेत्राचा दर्जा
१४ वर्षे वनवासात असताना अयोध्येतून श्रीराम, सीता व लक्ष्मण निघाले. फिरत फिरत वरुड-सुलतानपूर येथे त्यांनी पाच दिवस मुक्काम केला होता. प्रभू श्रीराम महादेवाची पूजा करीत असत. त्या काळात त्यांनी पाच दिवसात दररोज एक अशा पाच शिवपिंडी बनवल्या. या प्राचीन ठिकाणाचे महत्त्व ओळखून राज्य सरकारने मागील वर्षी या धार्मिक स्थळाला तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा दिला.

६० ट्रक दगडातून उभारतेय हेमाडपंती मंदिर
प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वरुड-सुलतानपूर या गावात हेमाडपंती मंदिर उभारावे, अशी गावकऱ्यांची इच्छा होती. ती आता पूर्णत्वास येत आहे. जमिनीपासून शिखरापर्यंत ५१ फूट उंच असे हे मंदिर आहे. रुंदी २४ बाय ५२ फूट आहे. शिखर ३१ फूट उंचीचे आहे. संपूर्ण काळ्या दगडात मंदिर उभारले जात असून त्यासाठी देगलूरहून ६० ट्रक दगड आणण्यात आला आहे. तीन वर्षांपासून काम सुरू आहे. वर्षभरात ते पूर्ण होईल.
- हरिश्चंद्र दांडगे (देशमुख), विश्वस्त

Web Title: Five Shiv Lingas created by Lord Sri Ramachandra in a single tank; Ancient shrine near Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.