आधी नडला आता पोलिसांसमोर गुडघ्यावर; कुणाल बाकलीवालला मुजोरी भोवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:29 IST2025-01-28T12:28:00+5:302025-01-28T12:29:36+5:30
दोन तासात सस्पेंड करतो, अशी धमकी देत वरिष्ठांना कॉल लावून देत पोलिसांनाच सुनावले.

आधी नडला आता पोलिसांसमोर गुडघ्यावर; कुणाल बाकलीवालला मुजोरी भोवली
छत्रपती संभाजीनगर : अर्वाच्च शिवीगाळ करून पोलिसांना कस्पटासमान लेखणाऱ्या कुणाल दिलीप बाकलीवाल (३८, रा. बीड बायपास परिसर) याच्या पोलिसांनी रविवारी मुसक्या आवळल्या. सायंकाळी ४:०० वाजता त्याला घरातून त्याला अटक केली. शिवाय, ज्या गाडीत बसून मुजोरी केली ती डिफेंडर कारही जप्त केली.
मिल कॉर्नर परिसरात २४ जानेवारीला सायंकाळी वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक विवेक जाधव सहकाऱ्यांसह वाहतूक नियमन करत हाेते. यावेळी बाकलीवालने व्हीआयपी सायरन वाजवत चौकाच्या मधोमध गाडी थांबवून पोलिसांना शिवीगाळ केली. दोन तासात सस्पेंड करतो, अशी धमकी देत वरिष्ठांना कॉल लावून देत पोलिसांनाच सुनावले. सुरुवातीला यात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे यांनी रविवारी यात दखलपात्र गुन्हा दाखल करून अटकेचे आदेश दिले. बाकलीवालच्या पोलिसांसोबतच्या उद्दामपणाचा पोलिसांनी रेकॉर्ड केलेला २ मिनिटे ३३ सेकंदांचा व्हिडीओ रविवारी राज्यभरात व्हायरल झाला. सोशल मीडियावरही नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
घरातून ताब्यात, हात जोडून माफी
आदेश प्राप्त होताच पोलिसांनी बीड बायपासवरील घरातून त्याच्या मुसक्या आवळून क्रांती चौक ठाण्याच्या कोठडीत टाकले. उपायुक्त बगाटे यांच्या समोर हजर केल्यावर त्याने उद्दामपणाबाबत हात जोडून माफी मागितली. त्याच्याकडील गाडी (एमएच २० जीके १८१९) ही भावेन आमिनच्या नावावर आहे.
मान खाली घालून उभा
बाकलीवालला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले. लंगडत न्यायालयात आलेला बाकलीवाल मान खाली घालून उभा होता. ॲड. आमेर काझी यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली. ॲड. गोपाळ पांडे यांनी बाकलीवालच्या वतीने बाजू मांडली. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त करणे, गाडीची माहिती घेण्याच्या मुद्द्यांवर पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपी पक्षाने मात्र गाडीची कागदपत्रे तत्काळ सादर केली. शिवाय, मोबाइल पोलिसांना सुपूर्द करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर केला.
...या कलमान्वये गुन्हा
सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून बीएनएस १३२ (सरकारी कामात हस्तक्षेप), ३५१ (२), ३५२ (धाकपटशाही करणे व करण्याबाबत शिक्षा) सह मोटरवाहन अधिनियम १०० (२), ११९(२), १७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सहायक आयुक्तांकडून त्याच्यावर आता प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल.