पैठणमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 18:44 IST2023-09-12T18:43:16+5:302023-09-12T18:44:10+5:30
इनकॅमेरा केली कागदपत्रांची पाहणी; गावातील रहिवासी असलेल्या वाईदेशी कुणबी मराठा समाजाशी चर्चा करून क्षेत्रपाहणी केली.

पैठणमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी
पैठण: तुमची जात कोणती? उपजिविकेचे साधन काय? कोणत्या देवाची भक्ती करता? तुमचे नातेगोते कुठले आहे? तुमच्या टीसीवर कुणबी अशी नोंद आहे का? असे अनेक प्रश्न पैठण तालुक्यात दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी विचारत वाईदेशी कुणबी समाजाची आज क्षेत्रपाहणी केली. कुणबी नोंद असलेले कागदपत्रे पुरावे म्हणून सादर करा पुढे याच कागदपत्राच्या आधारे शासनाकडे पाठपुरावा करता येईल अशी भूमिका मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी गावात घेतलेल्या ग्रामस्था समोर मांडली.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे व प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) यांनी पैठणसह तालुक्यातील, सोनवाडी, नानेगाव व एकतुणी गावाचा आज दौरा केला. गावातील रहिवासी असलेल्या वाईदेशी कुणबी मराठा समाजाशी चर्चा करून क्षेत्रपाहणी केली. यावेळी तहसीलदार सारंग चव्हाण, गटविकास अधिकारी उषा मोरे, मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे, ग्रामसेवक प्रशांत पाटील, तलाठी लक्ष्मीकांत गोजरे आदी उपस्थित होते.
पैठण शहरातील कुणबी समाजाच्या नागरिकांशी चर्चा करून आयोगाच्या सदस्यांनी तालुक्यातील सोनवाडी गावास भेट दिली. यावेळी वाईदेशी कुनबी मराठा समाजातील अनिरुद्ध नवले, दामोधर नवले, ज्ञानेश्वर नवले, तात्याराव टकले यांच्या घरी थेट जाऊन आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे व प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) यांनी घराची पाहणी केली.
कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून आर्थिक, धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक माहिती घेतली. यानंतर आयोगाच्या सदस्या निलिमा सरप यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालया समोर इनकॅमेरा बैठक घेण्यात आली. यावेळी टिसीवर कुणबी मराठा नोंद असेल व तुमचे इतर ठिकाणी कुणबी मराठा समाजाचे नातेवाईक असतील तर त्यांचे पुरावे ग्रामपंचायत कार्यालयात दिलेल्या आयोगाच्या फाॅर्म मध्ये भरून द्या, हे पुरावे ग्रामपंचायत तहसील कार्यालय जमा करतील. पुढे या पुराव्यानिशी वायंदेशी कुणबी मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांचा पाठपुरावा करता येईल, असे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य निलिमा सरप यांनी सांगितले. यावेळी बळिराम नवले, सुनिल नवले, दामोधर नवले, जगन्नाथ दुधे,ज्ञानेश्वर आल्हाट, बाळासाहेब माने, सर्जेराव गुंजाळ, गणेश नवले आदी उपस्थित होते. यानंतर नानेगाव ता पैठण येथे मंगळवारी दुपारी आडीज वाजता महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यासह पथक दाखल झाले. गावातील धोंडिराम माने, सोमनाथ चिकणे,केशव घाडगे,लक्ष्मण माने, रामभाऊ मगर यांच्या घरांची इनकॅमेरा पाहणी करण्यात आली.
अशी केली क्षेत्रपाहणी
यावेळी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करताना तुमचे कुलदैवत कोणते आहे?, तुमचे घरातील देव्हारे कुठे आहे?, तुमचा देव कोणता?, तुमची जात कोणती ?, तुम्हाला जमीन किती आहे ?, तुमचे नातेवाईक कुठे कुठे राहतात ? आदी प्रश्न विचारण्यात आले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालया समोर बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील वाईदेशी कुणबी समाजाचे प्रवेश निर्गम उतारे इनकॅमेरा पाहण्यात आले. यावेळी बाळासाहेब माने,गणपराव माने, रामेश्वर बोधने,केदार माने,भारत रुपेकर,सुदाम माने,दिपक शिर्के, अनिल बोधने, सोमनाथ चिकणे,केशव घाडगे, रमेश बोधने, भागिरथ बोधने, तुकाराम बोधने, पोलिस पाटील संतोष बोधने,बाजीराव मगर,बाप्पु मगर,ज्ञानेश्वर मगर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.