छत्रपती संभाजीनगर : जन्म प्रमाणपत्रात नावाच्या दुरुस्तीसाठी तीन हजारांची मागणी करून दोन हजारांची लाच घेताना मनपाच्या सफाई महिला सफाई कामगार शोभा मिठू आहेरकर (५६, रा. राहुलनगर) व वर्षा वसंत महिरे (३६, रा. कोटला कॉलनी) या दोघी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडल्या. शुक्रवारी सायंकाळी मोंढा नाका येथील मनपाच्या वॉर्ड कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार नागरिकाने मुलांच्या जन्म प्रमाणपत्रातील नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी मोंढा नाका कार्यालयात अर्ज दिला होता. मात्र, वारंवार जाऊनही त्यांचे काम होत नव्हते. महिरे व आहेरकर यांनी त्यांना कार्यालयातच नाव दुरुस्तीसाठी ३ हजार रुपये लागतील, अशी अट घातली. मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त तक्रारदाराने २२ ऑगस्ट रोजी एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली.
एसीबी पथकाने तत्काळ तक्रारीची पडताळणी केली. त्यात पंचासमक्ष दोन्ही आरोपी महिलांनी ३ हजारांची मागणी करून तडजोडीअंती २ हजार रुपये मागितले. त्यावरून पोलिस निरीक्षक धर्मराज बांगर, वाल्मीक कोरे, अंमलदार राजेंद्र जोशी, पुष्पा दराडे, आशा कुंटे, युवराज हिवाळे यांनी वॉर्ड कार्यालयातच सापळा रचला. त्यात आहेरकर व महिरे दोन हजार रुपये घेताना रंगेहाथ अडकल्या. जन्म प्रमाणपत्रात बदलीचे अधिकार नसताना महिला कामगारांना त्या कामासाठी लाच घेण्यासाठी कोणी पुढे केले, एसीबी त्यांच्यावर कारवाई करेल का, अशी खमंग चर्चा मनपा कार्यालयात या कारवाईनंतर सुरू होती.