करमाडच्या छावणीत शेतकऱ्यांना ५ रुपयांत पोटभर जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 20:27 IST2019-05-20T20:25:11+5:302019-05-20T20:27:47+5:30
शेतकऱ्यांना जेवण देणारी राज्यातील पहिलीच चारा छावणी

करमाडच्या छावणीत शेतकऱ्यांना ५ रुपयांत पोटभर जेवण
करमाड (औरंगाबाद ) : पशुधनाला चारा-पाणी देण्यासाठी छावणीत रात्री मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांना ५ रुपयांत पोटभर जेवण देण्याचा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला असून, याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू करण्यात आली. जेवणाची व्यवस्था करणारी राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती राधाकिसन पठाडे यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
सध्या औरंगाबाद पूर्व तालुक्यात करमाडची एकमेव छावणी सुरू असून, ३० कि़मी.पर्यंतच्या गावांतून येथे ११०० पेक्षा अधिक जनावरे दाखल झालेली आहेत. या जनावरांची देखभाल करण्यासाठी चारा पाणी देण्यासाठी या ठिकाणी २४ तास शेतकरी थांबले आहेत. अनके शेतकरी सकाळी घरून येताना जेवण सोबत आणतात; परंतु मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांना घरी जाणे शक्य होत नसल्याने बाजार समितीने शेतकऱ्यांना रात्रीचे जेवण देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली. शनिवारपासून शेतकऱ्यांना केवळ ५ रुपयांत पोटभर जेवण दिले जाणार आहे.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांसोबत जेवण करून याचा शुभारंभ केला. यावेळी उपसभापती भागचंद ठोंबरे, सचिव विजय शिरसाठ, सहाय्यक सचिव के. आर. चव्हाण, संचालक श्रीराम शेळके, नारायण मते, प्रदीप दहीहंडे यांच्यासह दामूअण्णा नवपुते, भावराव मुळे, सुदाम पोफळे, सजन मते, अशोक पवार, रामकिसन भोसले, दत्ता उकर्डे, सुदाम ठोंबरे, मंडळ अधिकारी अनिल सूर्यवंशी, तलाठी संतोष लोळगे, हरिश्चंद्र काथार आदी उपस्थित होते.
३० कि.मी.पर्यंतच्या गावांतील जनावरे
सध्या औरंगाबाद पूर्व तालुक्यात करमाडची एकमेव छावणी सुरू असून, ३० कि़मी.पर्यंतच्या गावांतून येथे ११०० पेक्षा अधिक जनावरे दाखल झालेली आहेत. या जनावरांची देखभाल करण्यासाठी चारा पाणी देण्यासाठी या ठिकाणी २४ तास शेतकरी थांबले आहेत. अनके शेतकरी सकाळी घरून येताना जेवण सोबत आणतात; परंतु मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांना घरी जाणे शक्य होत नसल्याने त्यांना रात्रीचे जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे.