धाक संपला ! कुख्यात गुन्हेगाराचा पोलिसांवर चाकू हल्ला, १५ दिवसांत हल्ल्याची चौथी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:15 IST2025-01-21T12:15:21+5:302025-01-21T12:15:39+5:30
छत्रपती संभाजीनगरात १५ दिवसांतील पोलिसांवर हल्ल्याची चौथी घटना, हाताला कडकडून चावा घेतल्याने गुन्हे शाखेचे अंमलदार जखमी

धाक संपला ! कुख्यात गुन्हेगाराचा पोलिसांवर चाकू हल्ला, १५ दिवसांत हल्ल्याची चौथी घटना
छत्रपती संभाजीनगर : ‘आज तुमको खत्म कर देता’, असे म्हणत कुख्यात गुन्हेगार शेख वाहेद शेख मोहसीन (२१, रा. सईदा कॉलनी) याने गुन्हे शाखेच्या पथकावर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी हा वार चुकवला. मात्र, यात त्याने कडकडून चावा घेतल्याने एक अंमलदार जखमी झाला. रविवारी सायंकाळी जटवाड्यात ही घटना घडली.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांना वाहेदने रविवारी कांचनवाडीतील दुकान फोडल्याची माहिती मिळाली होती. अंमलदार विजय निकम, मनोहर गिते, कृष्णा गायके, ज्ञानेश्वर पवार यांच्यासह प्रवीण वाघ सायंकाळी जटवाडा रोडवर गेले. एका चहाच्या हॉटेलवर वाहेद दिसताच त्यांनी तेथे धाव घेतली. पथक त्याच्याजवळ जाताच त्याने शर्टखालून चाकू काढून पथकाच्या दिशेने भिरकावला. अंमलदार निकम यांनी त्याला कंबरेला पाठीमागून पकडले. त्यात वाहेदने दंडाला कडकडून चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. इतरांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर तो सतत चाकू भिरकावत राहिला. यात पोलिस व त्याच्यात चांगलीच झटापट झाली. त्याला नियंत्रणात आणून अटक करण्यात आली, तर जखमी निकम यांना रुग्णालयात दाखल केले.
तुमको खत्म कर देता
वाहेदकडे ३० सेमी लांब व ३ सेमी रुंदीच्या पात्याचा धारदार चाकू होता. त्याने पोलिसांना शिवीगाळ करून मोठमोठ्याने चाकू उगारून ‘आज तुमको खत्म कर देता’, अशी धमकी दिली. त्याच्याकडील मोबाइल कांचनवाडीतील चोरीच्या गुन्ह्यातील निष्पन्न झाला. त्याच्यावर बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करून यथेच्छ पाहुणचारही करण्यात आला. सहायक निरीक्षक शेषराव खटाणे तपास करत आहेत. त्याच्यावर आतापर्यंत लूटमार, दरोडा, हत्येचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ल्याचे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ क्रूर गुन्हेगार असून, सध्या हत्येच्या गुन्ह्यात कारागृहात आहे.
धाक संपला, पोलिसांवर हल्ल्याची चौथी घटना
-२ जानेवारी रोजी वाळुजच्या एनआरबी चौकात वाहतूक पोलिसांना मारहाण करण्यात आली.
-६ जानेवारी रोजी रोपळेकर चौकात अल्पवयीन मुले वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून गेले.
-१७ जानेवारी रोजी भर दुपारी गुन्हेगाराने पोलिस अंमलदारावर चाकू भिरकावून धमकावले.