नागद घाटात भीषण अपघात; ऊसतोड मजुरांसह १७ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:05 IST2026-03-29T16:04:34+5:302026-03-29T16:05:12+5:30
दरीत कोसळताच वाहनाने चार वेळा पलट्या घेतल्या.

नागद घाटात भीषण अपघात; ऊसतोड मजुरांसह १७ जण गंभीर जखमी
कन्नड : तालुक्यातील नागद घाटात रविवारी (दि. 29) सकाळी भीषण अपघात घडून ऊसतोड मजूर, महिला आणि लहान मुलांसह एकूण 17 जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जखमी मजूर आणि लहान मुलांच्या वेदनांनी उपस्थितांचे मन सुन्न झाले.
टेम्पो दरीत कोसळला
माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती येथून दस्तापूर (ता. सोयगाव) येथे मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो (क्र. MH 21 BH 0442) रविवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास कन्नड-नागद मार्गावरील म्हसोबा वळणाजवळ पोहोचला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टेम्पो खोल दरीत कोसळला. दरीत पडताना वाहनाने चार वेळा पलट्या घेतल्याने प्रवाशांमध्ये भीषण आक्रोश पसरला.
जखमींची नावे
या अपघातात वंदना अशोक अंभोरे, रुकसाना सलीम तडवी, दिव्या हिरामण पगारे, सोनाबाई सलीम तडवी, रंजनाबाई हिरामण पगारे, आशा सुखदेव पगारे, कोमल हिरालाल पगारे, मनीषा प्रवीण वाघ, प्रवीण बापू वाघ, ममता प्रवीण वाघ, ऋतिक प्रवीण वाघ, सलीम जमाल तडवी, अजित मुक्तार तडवी (सर्व रा. दस्तापूर, ता. सोयगाव) तसेच चालक महेश दीपक माने (रा. बारामती) यांच्यासह लहान बालके, असे एकूण 17 जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस आणि प्रशासनाचे मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकूर आणि प्रदीप पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कन्नड ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिका तातडीने बोलावून जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले.
जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले
ग्रामीण रुग्णालयात डॉ. रुक्सान खान यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. यावेळी तहसील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंडळ अधिकारी तुकाराम सपकाळ व ग्राम महसूल अधिकारी नितीन मगरे यांनी मदतकार्याला सहकार्य केले.