शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत

By Admin | Updated: July 12, 2014 01:15 IST2014-07-12T00:15:03+5:302014-07-12T01:15:41+5:30

उस्मानाबाद : महागाईमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, अन्नधान्याची साठेबाजी होऊ नये आणि किमान दरात नागरिकांना भाजीपाला, फळफळावळ उपलब्ध व्हावेत

Farming directly to customers | शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत

शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत

उस्मानाबाद : महागाईमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, अन्नधान्याची साठेबाजी होऊ नये आणि किमान दरात नागरिकांना भाजीपाला, फळफळावळ उपलब्ध व्हावेत आणि शेतकऱ्यांनाही त्यांचा शेतमाल थेट विक्री करता यावा, यासाठी आता प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात विक्री केंद्र सुरु करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे पंचायत समितीसमोर या थेट शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. अधिकाधिक शेतकऱ्यांनी याठिकाणी आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा आणि ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. नारनवरे यांनी केले.
महागाईवर नियंत्रण ठेवण्याबाबत आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्याबाबत जिल्हा पुरवठा विभाग, कृषी विभाग आणि पणन विभाग यांच्या सहकार्याने आता जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात शेतकरी आणि शेतकरी गटांमार्फत थेट शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना योग्य भावात अन्नधान्य, फळभाज्या, फळे मिळू शकतील, असे यावेळी डॉ. नारनवरे यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मदनलाल मिनीयार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सध्या प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे. उस्मानाबाद शहरात बार्शी नाका येथेही विक्री केंद्र सुरु होणार आहे. तुळजापूर येथे नळदुर्ग आणि तुळजापूर येथील पंचायत समिती परिसरात, उमरगा येथे कृषी चिकित्सालय आणि मुख्य रस्त्यालगत अशी दोन तर भूम येथे समर्थ नगर, परंडा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर आणि मुख्य रस्ता, बार्शी रोड तर कळंब येथे नगरपालिका जवळ आणि द्वारकानगरी सोसायटी, शिवाजी चौक, कळंब येथे ही थेट शेतमाल विक्री केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

प्रत्येक शहरात होणार दोन केंद्रांची निर्मिती
जिल्ह्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र १ हजार ७०६ एवढे आहे. सरासरी उत्पादकताही १७.०१ टन प्रति हेक्टरी अशी आहे तर एकूण उत्पादन हे २९ हजार ३० टन इतके आहे. या भाजीपाला पिकांमध्ये मुख्यत: पालेभाज्या, वांगे, टोमॅटो, गवार, मुळा, पडवळ, घेवडा, कारले, दोडका, भोपळा, बटाटा, काकडी आदी मुख्य भाजीपाला पिकांचा समावेश होतो. याशिवाय, मसाला पिकाखालील क्षेत ६ हजार १२८ हेक्टर इतके आहे. कांदा, लसूण, अद्रक, हळद ही पिके मसाला पिके म्हणून घेतली जातात. सरासरी उत्पादकता १६.५१ टन प्रति हेक्टरी अशी आहे.
जिल्ह्यात एकूण ९ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. यापैकी केवळ उस्मानाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक होऊन लिलावाद्वारे त्याची विक्री केली जाते. तसेच जिल्ह्यातील ५४ आठवडी बाजारामध्येही शेतकरी त्यांच्या भाजीपाला पिकाची विक्री करतात. आताच्या या थेट शेतमाल विक्री केंद्राचा लाभ आता शेतकऱ्यांना घेता येणार असल्याने संबंधित शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्याही दृष्टीने हा उपक्रम लाभदायक ठरणार आहे.

Web Title: Farming directly to customers