कांदा लागवडीसाठी शेतकरी सज्ज, पण मजूर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:58+5:302021-01-08T04:11:58+5:30
गल्ले बोरगाव : कांदा लागवडीची लगबग गल्ले बोरगाव परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. लागवडीपूर्वीची मशागत करून शेतकरी ...

कांदा लागवडीसाठी शेतकरी सज्ज, पण मजूर मिळेना
गल्ले बोरगाव : कांदा लागवडीची लगबग गल्ले बोरगाव परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. लागवडीपूर्वीची मशागत करून शेतकरी सज्ज झाला आहे. कांद्याचे रोप लागवडीसाठी लागणारे मजूरच भेटत नसल्याने मजुरांना अधिकचा मोबदला द्यावा लागत आहे.
गल्ले बोरगाव व लगतच्या गावातील शेतकऱ्यांचे पुढील आर्थिक गणित हे सर्वस्वी कांदा पिकावर अवलंबून आहे. कांदा हेच मुख्य नगदी पीक म्हणून समजले जाते. त्यासाठी शेतकरी वर्ग रात्रीचा दिवस करीत असतो. यावर्षी कांदा लागवडीसाठी मजुरांनी आपली रोजंदारी वाढविली आहे. एकरी तीन ते चार हजार रुपयांची वाढ झालेली आहे. मजुरांची कमतरता जाणवत असल्याने बाहेरगावाहून मजूर आणून शेतकरी आपली कांदा लागवड करू लागला आहे. घरापासून ते शेतात मजूर आणण्यासाठी व त्यांना परत घरापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था ही शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर वेगळा आर्थिक भारही पडला जात आहे.
---------------------
कांदा लागवडपूर्व शेतीतील मशागत पूर्ण झाली आहे. यासाठी मोठा आर्थिक भार शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. लागवडीबरोबरच उत्पादनाचा खर्च देखील वाढणार आहे. चालूवर्षी पाच एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली. तर साधारणत: एक ते दीड लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. रोपे वाढीच्या अवस्थेतच पाऊस पडल्याने कांद्याचे रोप पूर्ण वाया गेली आहेत. त्यामुळे शेतात कांदा लागवड करायची असेल तर कांद्याचे रोप विकत आणि तेही भरमसाठ पैसे देऊन आणल्याशिवाय पर्याय उरला नाही. या महिन्यात कांद्याची लागवड झाली तरच उत्पादन चांगले मिळते. - बापू माधवराव चंद्रटिके, कांदा उत्पादक शेतकरी.
---------
फोटो :
कांदा लागवड करताना बोरगाव अर्ज परिसरातील एका शेतातील दृश्य...