शेकडो क्विंटल झेंडू सोडून शेतकरी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 13:06 IST2018-10-19T13:05:58+5:302018-10-19T13:06:52+5:30
आदल्या दिवशी ३० ते ४० रुपये किलोपर्यंत विक्री झालेला झेंडू आज चोहोबाजूने आवक होताच ५ ते १० रुपयांपर्यंत खाली गडगडला.

शेकडो क्विंटल झेंडू सोडून शेतकरी परतले
औरंगाबाद : आदल्या दिवशी ३० ते ४० रुपये किलोपर्यंत विक्री झालेला झेंडू आज चोहोबाजूने आवक होताच ५ ते १० रुपयांपर्यंत खाली गडगडला. अखेर शिल्लक राहिलेला शेकडो क्विंटल झेंडू रस्त्यावरच ठेवून विक्रेत्यांनी घरचा रस्ता धरला.
जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ भाजीपाल्याच्या अडत बाजारात झेंडूची २०० टनपेक्षा अधिक आवक झाली. दसऱ्याच्या आदल्या दिवसापासूनच येथे झेंडूची आवक सुरू झाली होती. आज गुरुवारी सकाळपर्यंत शेतकरी गाड्या भरून झेंडू आणत होते. बुधवारी अडत व्यवहारात २० ते ३० रुपये किलोपर्यंत झेंडू विक्री झाला होता; पण रात्रीतून हिंगोली, परभणी, नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक झाली.
तसेच आसपासच्या पंचक्रोशीतूनही अधिक झेंडू विक्रीसाठी आला होता. शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून झेंडू आणणे कमी केले होते आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी झेंडू तोडून आज तो बाजारात आणला. चोहीबाजूने झेंडूची आवक झाल्याने जाधववाडीत ५ ते १० रुपये किलोपर्यंत झेंडू विक्री झाला. दुपारी १ वाजेनंतर येथील विक्रेत्यांनी शिल्लक राहिलेला झेंडू जागेवरच सोडून निघून गेले.
सुरुवातीला २० ते २५ रुपये किलोने झेंडू विकला जात होता. मात्र, दुपारनंतर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत असल्याचे पाहून विक्रेत्यांनी १५ रुपयांपर्यंत भाव खाली आणले होते. जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास रोड, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, सूतगिरणी रोडवर सगळीकडे झेंडूच झेंडू दिसून येत होते.