टोमॅटोचा योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला; धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:05 IST2025-10-25T13:04:39+5:302025-10-25T13:05:02+5:30
टोमॅटोचा योग्य दर न मिळाल्याने आंदोलन : धुळे-सोलापूर महामार्गावर वाहतूककोंडी

टोमॅटोचा योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला; धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
कन्नड : तालुक्यातील पानपोई फाटा येथील उपबाजार समितीत टोमॅटोला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. चिडलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सोलापूर-धुळे महामार्गावर पाचशे ट्रॅक्टर उभे करून रास्ता रोको आंदोलन केले. पाच तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे दहा ते पंधरा कि.मी. अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांसह वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले.
कन्नड तालुक्यातील पानपोई फाटा येथे उपबाजार समिती असून येथील टोमॅटो मार्केटमध्ये तालुक्यातील शेतकरी टोमॅटो विकायला आणतात. गुरुवारी शेतकऱ्यांना टोमॅटोला १५ ते २० रुपये किलो दर मिळाला. यामुळे शुक्रवारी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीला आणला होता. मात्र, व्यापाऱ्यांनी भाव पाडून तो १० ते १२ रुपये किलोपर्यंत आणला. तसेच कॅरेटमागे दहा रुपयांची कपात व व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून टोमॅटो विकण्यास नकार दिला. यावेळी व्यापाऱ्यांनीही ताठर भूमिका घेतली. या गोंधळात शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी आणलेले टोमॅटोचे सुमारे ५०० ट्रॅक्टर दुपारी ४ वाजता सोलापूर-धुळे महामार्गावर उभे करून तीव्र घोषणाबाजी सुरू केली. वाढता वाहतूक खर्च, टोमॅटोचा खराब होण्याचा धोका आणि अन्यायकारक दर यामुळे शेतकरी महामार्गावरून हटण्यास तयार नव्हते. ‘आमच्या मालाला योग्य दर द्या’, अशा घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या.
रास्ता रोको आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा रस्ता हतनूरपर्यंत, तर कन्नडकडे जाणारा रस्ता अंधानेर फाट्यापर्यंत जाम झाला. दोन्ही बाजूंनी नुसत्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कन्नड ठाण्याचे पोनि. सानप यांच्यासह पथकही घटनास्थळी दाखल झाले. शेवटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. टोमॅटोचे दर ठरविण्यासाठी तसेच इतर मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पाच तासांनी आंदोलन मागे घेतले.