छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पीएच.डी.ला बनावट एम.फिल. पदवीच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या घोटाळ्याची व्याप्ती आता राज्याबाहेर पोहचली आहे. गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या राजीवसिंग अरोरा यास कर्नाटकातून अटक केली. त्यास दि. ६ रोजी न्यायालयात हजर केले असता, १० मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
बनावट पदवी घोटाळ्यात शहर पोलिसांनी सहावा आरोपी पकडला आहे. राजीवसिंग प्रेमसिंग अरोरा ( वय ३५, रा. ई-९६, सत्यम पुरम एरिया, न्यू दिल्ली) या आरोपीचा ताबा कर्नाटक पोलिसांकडून घेण्यात आला. या प्रकरणात खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव अस्मा खान आणि सहसचिव मकसुद खान या दोघांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यात अस्मा खान हिला अटक केल्यानंतर तिच्या जबाबावरून कोहिनूर संस्थेचा अध्यक्ष मजहर खान यास अटक केली. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत शेख मोहम्मद हफीज उररहमान याने बनावट पदवीच्या आधारे नोकरी मिळविल्याचे समोर आल्यानंतर त्यास अटक केली होती. त्याने दिलेल्या जबाबावरून महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यास अटक केली.
त्याचवेळी मुख्य आरोपी मकसूद खान यास जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आतापर्यंत अटक केलेले ४ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य आरोपी मजहर खान यांच्या चौकशीतून त्याला बनावट पदव्या व गुणपत्रके ही राजीवसिंग अरोरा याने बनवून दिल्याचे सांगितले. त्यावरून शहर पोलिसांनी त्यास कर्नाटक पोलिसांच्या ताब्यातून अटक केली आहे. अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केल्यानंतर १० मेपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग करीत आहेत.
पदव्यांची पडताळणी झाली का?अटक आरोपी मजहर खान याच्या संस्थेतील काही प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बनावट पदवीच्या आधारे नोकरी मिळविल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडे पडताळणी करून मागितलेली आहे. विद्यापीठ प्रशासनाने पडताळणी करुन दिली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.