छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचे रॅकेट सुरूच; सीडीएममध्ये मशीनद्वारे १०६ नोटा झाल्या जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:00 IST2025-08-28T15:59:11+5:302025-08-28T16:00:02+5:30

अहिल्यानगर पोलिसांनी महिनाभरापूर्वी उघडकीस आणले होते मोठे रॅकेट; शहरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंटसह पेट्रोलपंपावर वापर करण्याचा होतोय प्रयत्न

Fake currency racket continues in Chhatrapati Sambhajinagar: 106 notes deposited through machine in CDM | छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचे रॅकेट सुरूच; सीडीएममध्ये मशीनद्वारे १०६ नोटा झाल्या जमा

छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचे रॅकेट सुरूच; सीडीएममध्ये मशीनद्वारे १०६ नोटा झाल्या जमा

छत्रपती संभाजीनगर : बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आल्याच्या महिनाभरानंतर शहरात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट अद्यापही सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी पुंडलिकनगरच्या आयडीएफसी बँकेच्या सीडीएम मशीन (कॅश डिपॉझिट मशीन)मध्ये अज्ञाताने साडेसहा हजारांच्या बनावट नोटा टाकून खात्यातून खऱ्या नोटा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच बँकेने खाते गोठवत या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

बँकेचे उपशाखा अधिकारी स्वप्निल अजमेरा (३५) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० वाजता गजानन महाराज मंदिर परिसरातील बँकेच्या शाखेच्या सीडीएम मशीनमध्ये बनावट नोटा जमा झाल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. बँकेने अधिक माहिती घेतल्यावर खातेदार सरफराज खान सलीम खान (बिस्मिल्ला कॉलनी) याने २४ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ५०० रुपयांच्या एकूण १०६ नोटा टाकल्या होत्या. त्यांपैकी १३ नोटा बनावट निष्पन्न झाल्या. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक रेशीम कोळेकर या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महिनाभरापूर्वी उघडकीस आला होता कारखाना
वाळूज परिसरात ३१ जुलै रोजी अद्ययावत मशीनद्वारे बनावट नोटा छापण्याचा कारखानाच उघडण्यात आला होता. राज्यभरात हे रॅकेट चालवणाऱ्या अंबादास रामभाऊ ससाणे ऊर्फ अरुण भास्कर वाघ ऊर्फ मेजर (४५, रा. शहर टाकळी, ता. शेवगाव) याचाच हा कारखाना होता. यात बीड, परळीपर्यंत पाळेमुळे निष्पन्न झाली होती.

शहर पोलिस अनभिज्ञ
३१ जुलै रोजी अहिल्यानगरमध्ये उघडकीस आलेल्या रॅकेटमध्ये शहरातील चार स्थानिक तरुण निष्पन्न झाले होते. २०१९ पासून शहरात जवळपास सात वेळा बनावट नोटांचे रॅकेट वारंवार उघडकीस येऊनही शहर पोलिसांसह एटीएसही यांची पाळेमुळे शोधण्यात अपयशी ठरले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, बारसह पेट्रोलपंपावर अजूनही या बनावट नोटा आढळून येत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

मेजर पसारच, परराज्यात लपल्याचा संशय
अहिल्यानगर पोलिसांच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेला अंबादास ऊर्फ मेजर महिनाभरानंतरही पसार आहे. अहिल्यानगर पोलिसांच्या माहितीप्रमाणे, अंबादासने त्याच्या टोळीद्वारे वाटलेले पैसे अद्यापही चलनात वापरण्याचा प्रयत्न होत आहे. आठवडाभरापूर्वीच दुसऱ्यांदा अशा नोटा वापरणारे तरुण पकडण्यात आले होते. मेजरचा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबईत शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नाही. तो परराज्यात जाऊन लपल्याचा पोलिसांना संशय आहे.

Web Title: Fake currency racket continues in Chhatrapati Sambhajinagar: 106 notes deposited through machine in CDM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.