दहावी अनुत्तीर्ण, पण पीएच.डी. मिळवून झाली प्राचार्य; भावानेच केली बहिणीची तक्रार, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:23 IST2025-11-15T19:22:57+5:302025-11-15T19:23:45+5:30
भावानेच विद्यापीठाकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यात दहावी अनुत्तीर्ण असूनही प्राचार्या कशा, असा सवाल उपस्थित केला

दहावी अनुत्तीर्ण, पण पीएच.डी. मिळवून झाली प्राचार्य; भावानेच केली बहिणीची तक्रार, गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : दहावीला अनुत्तीर्ण असतानाच बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. पूर्ण करीत प्राध्यापक बनल्या. त्यानंतर प्राचार्यपदी निवड झाली. मात्र, दहावी उत्तीर्ण नसल्याचे भावाला माहीत होते. त्यानेच बहिणीच्या दहावीच्या गुणपत्रकाविषयी विद्यापीठाकडे तक्रार केली. त्यावरून चौकशी झाल्यानंतर संस्थेने संबंधित प्राध्यापिकेला बडतर्फ केले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने सिटी चौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
डॉ. नसीम इकबाल ममदानी असे आरोपी महिलेचे नाव आहे. सुफा एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित शरणापूर येथील डीएसआर कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये त्या प्राध्यापक होत्या. कॉलेजच्या तत्कालीन प्राचार्याच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची प्राचार्यपदी नियुक्ती झाली. प्रभारी प्राचार्य डॉ. एजाज अली सय्यद अमजद अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डॉ. ममदानी या दहावी अनुत्तीर्ण असूनही गुणपत्रिकेत फेरफार करून त्यांनी बारावीमध्ये प्रवेश मिळविला. त्याच आधारावर त्यांनी पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्यांची मुलाखतीद्वारे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. मात्र, आरोपीच्या भावानेच विद्यापीठाकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यात नसीम ममदानी दहावी अनुत्तीर्ण असूनही प्राचार्या कशा, असा सवाल उपस्थित केला. तेव्हा विद्यापीठाने या प्रकरणी संस्थेकडून खुलासा मागविला. संस्थेने चौकशी सुरू केली असता आरोपीने दहावीची गुणपत्रिका सादर करण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चौकशीला गैरहजर
संस्थेने या प्रकरणी स्वतंत्र चौकशी समिती नेमली. त्या चौकशीला आरोपी गैरहजर राहिल्या. चौकशी समितीच्या २७ फेब्रुवारी २०२३ च्या अहवालानुसार, आरोपीने संस्था व शासनाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. तसेच बडतर्फी पुरेशी नसून फौजदारी कारवाई होऊन पोलिस तपास व्हावा, अशी शिफारस केली. त्यानुसार पोलिसांत तक्रार देण्यात आली. मात्र, पोलिसांनी दखल घेतली नसल्यामुळे न्यायालयात प्रकरण गेले. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंदविण्यात आला.
सोशल मीडियात बदनामी, संस्थेत अपहार
फिर्यादीनुसार आरोपीने संस्थेसह पदाधिकाऱ्यांची सोशल मीडियात बदनामी केली. त्याशिवाय प्राचार्या असताना संस्थेच्या बँक खात्यातून अधिकाराचा दुरुपयोग करून २० ऑक्टोबर २०२१ रोजी शासकीय शिष्यवृत्ती खात्यातील ३ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग केली. लेखा परीक्षकांनी लेखा परीक्षणादरम्यान ही अनियमितता उघडकीस आणल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.