बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी उघड, तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 20:04 IST2024-09-23T20:00:39+5:302024-09-23T20:04:28+5:30
याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत

बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी उघड, तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदण्याचे प्रयत्न झाल्याचे काही ठिकाणी उघडकीस आले आहे, याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले.
दुबार मतदार नोंदणीची पडताळणी व त्यानंतर करावयाची नावे वगळणी याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा घेण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, सर्व विधानसभा क्षेत्रांचे निवडणूक निर्णय अधिकारी आदी या बैठकीस उपस्थित होते.
सात दिवसांत एका ठिकाणचे नाव कमी करा
दुबार मतदार नोंदणीबाबत करावयाच्या पडताळणीचा आज आढावा घेण्यात आला. विधानसभा क्षेत्रनिहाय हा आढावा घेण्यात आला. ज्या मतदारांना हे माहिती आहे की, आपले नाव दोन ठिकाणी नोंदविलेले आहे अशांनी स्वतःहून फॉर्म नं ७ भरुन आपले नाव वगळावे. त्यासाठी त्यांना दि. ३० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच विहित प्रक्रियेचा वापर करुन नावे वगळण्याची प्रक्रियाही केली जाईल,असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
तसेच जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदविण्याचे प्रकार निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आले आहेत. अशा प्रकरणांची माहितीही विधानसभा क्षेत्रनिहाय सादर करण्यात आली. या प्रकरणात तात्काळ गुन्हे दाखल करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.