गाडीत गॅस भरताना स्फोट, सिलेंडर समोरील घरात शिरले; पुन्हा फ्रीजच्या स्फोटाने गाव हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 15:16 IST2024-04-15T15:16:14+5:302024-04-15T15:16:32+5:30
घरगुती गॅस कारमध्ये भरताना स्फोट, कार, दुकान जळून खाक; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटना

गाडीत गॅस भरताना स्फोट, सिलेंडर समोरील घरात शिरले; पुन्हा फ्रीजच्या स्फोटाने गाव हादरले
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : रस्त्यालगत कार थांबवून त्यामध्ये घरगुती सिलिंडरमधील गॅस भरताना स्फोट होऊन कार जळाली, तर पेटलेले सिलिंडर एका शीतपेयाच्या दुकानात गेल्याने तेथे फ्रीजचा स्फोट होऊन दुकान जळून खाक झाल्याची फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथील बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी घडली.
रिधोरादेवी येथील आली खान अजीज खान हा कुटुंबीयांसोबत कारने सोमवारी सिल्लोडकडे जात होता. दुपारी बारा वाजेच्या सुमारास निमखेडा येथे रस्त्यालगत थांबवून आली खान याने सोबत आणलेल्या घरगुती गॅसच्या सिलिंडरमधून कारमध्ये गॅस भरताना सिलिंडरने अन् कारने पेट घेतला आणि काही कळायच्या आतच पेटते सिलिंडर उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या सरपंच नामदेव खेत्रे यांच्या शीतपेयाच्या दुकानात जाऊन पडले. त्यामुळे या दुकानात आग लागली आणि दुकानातील फ्रीज पेटला. त्यानंतर या फ्रीजचा स्फोट झाला. पहिला गॅस सिलिंडर आणि दुसरा फ्रीजचा स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील ग्रामस्थ हादरले. त्यानंतर काही क्षणात सरपंच खेत्रे यांचे शीतपेयाचे दुकान जळून खाक झाले.
मोठा अनर्थ टळला
कारमध्ये मालक अली खान, त्यांची आई, मामा व चालक कैसर शेख असे चार जण होते. अली खान हा कारमध्ये गॅस भरत असताना चालक जवळच होता तर इतर तिघे काही अंतरावर असलेल्या झाडाच्या सावलीत थांबले होते. सिलिंडरने पेट घेतल्यानंतर ते उडून बाजूच्या दुकानात गेले. त्यानंतर दुकान जळून खाक झाले. सुदैवाने यावेळी दुकानात एकही ग्राहक नव्हता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.