मराठवाड्यात खरीप हंगामाला दमदार पावसाची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 19:30 IST2019-06-29T19:29:35+5:302019-06-29T19:30:48+5:30
पुरेसा पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होणार

मराठवाड्यात खरीप हंगामाला दमदार पावसाची अपेक्षा
औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाला दमदार पावसाची अपेक्षा आहे. ४५ लाख हेक्टरच्या आसपास खरीप हंगामात पेरणी होते. यावर्षी २८ जूनपर्यंत किती हेक्टरवर पेरण्या झाल्या याचा निश्चित आकडा समोर आलेला नाही. पावसाने २३ दिवसांत हुलकावणी दिल्यामुळे पेरण्यांनी अजून वेग घेतलेला नाही.
गेल्या वर्षी ३० जूनपर्यंत २३ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी हे प्रमाण ८ टक्क्यांच्या आसपास आहे. १५ टक्के पावसाचा खंड पडल्यामुळे पेरण्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. १३६ मि.मी. पाऊस आजवर होणे अपेक्षित होते. ४४.६ मि.मी. इतका पाऊ स विभागात झाला आहे. ९२ मि.मी. पावसाचा खंड वार्षिक सरासरीच्या तुलनेत पडल्यामुळे खरीप हंगाम यंदाही धोक्याच्या वळणावर उभा आहे. २०१८ सालचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. जून आणि जुलै हे दोन्ही महिने गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पर्जन्यमान देऊ शकले नाही. त्याच्या परिणामी यावर्षी उन्हाळा भयावह राहिला. ३२०० टँकरने विभागात पाणीपुरवठा करावा लागला. यावर्षी वरुणराजा दुष्काळ आणि शेतीला दिलासा देईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
अभ्यासकांचे मत असे
हवामानाचे अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. वाऱ्याची दिशा, वेग आणि वेळेत परिवर्तन झाले आहे. हा आभासी मान्सून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात. मान्सूनचे वारे पूर्वेकडे झुकले आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात पाऊस झाला. सध्या मान्सून कमजोर आहे. तो पुढे सरकत नाहीय. हवामान खात्याने मात्र मान्सून आल्याचे जाहीर करून टाकले आहे.
विभागातील प्रकल्पांत ०.४० टक्के पाणी
विभागातील एकूण ८७२ प्रकल्पांत ०.४० टक्के जलसाठा आहे. जूनअखेर आला असून, प्रकल्प परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट अजून कायम आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत ०.२१ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ०.६० टक्के, ७४९ लघु प्रकल्पांत १.२० टक्के, गोदावरी आणि इतर बंधाऱ्यांत शून्य टक्के जलसाठा आहे.