अस्मानी संकटातून केवळ लष्करामुळे सुटका
By Admin | Updated: September 12, 2014 00:31 IST2014-09-12T00:20:31+5:302014-09-12T00:31:24+5:30
औरंगाबाद : वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या शहरातील आठ भाविकांची लष्कराने सुखरूप सुटका केली.

अस्मानी संकटातून केवळ लष्करामुळे सुटका
औरंगाबाद : वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या शहरातील आठ भाविकांची लष्कराने सुखरूप सुटका केली. परंतु त्याअगोदर पुराने वेढलेल्या हॉटेलात जीव मुठीत घेऊन त्यांना चार दिवस-रात्र जागून काढाव्या लागल्या. प्राणावर बेतलेले अनुभव सांगताना आजही ते शहारून जातात.
वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी म्हणून शहरातील राजेंद्र प्रल्हाद राठोड, औरंगाबाद पंचायत समितीचे सदस्य रघुनाथ वाघमोडे, भगवान चंदनसे, नारायण घोडके, अनिल पवार, आनंद भालेकर, दिनेश चव्हाण व मुंदडा ही मित्र कंपनी निघाली होती. दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी विमानाने ही मंडळी जम्मूच्या विमानतळावर उतरली. बाहेर पाऊस पडत होता. परंतु त्याचे काही विशेष त्यांना वाटले नाही. जम्मूहून कटरा ६० किलोमीटर अंतरावर आहे. पडत्या पावसात त्यांनी जम्मू ते कटरा हे अंतर टॅक्सीने पार केले. कटरा येथे त्यांची व्यवस्था बाली रिसॉर्टमध्ये करण्यात आली होती. हे रिसॉर्ट तावी नदीच्या किनाऱ्यावरच आहे. हॉटेलात दाखल होऊन ते उद्याच्या वैष्णोदेवी प्रवासाची आखणी करीत होते. बाहेर धो-धो कोसळणाऱ्या पावसाने तोपर्यंत आक्राळविक्राळ रूप धारण केल्याची खबरबातही पहाटेपर्यंत त्यांना नव्हती.
राजेंद्र राठोड म्हणाले, सकाळीच लष्कराने धोक्याचा सायरन वाजविला. तेव्हा कुठे आम्हाला बाहेर काही तरी आक्रीत घडलंय याची जाणीव झाली. दि. ५ सप्टेंबर रोजी कटरा ते वैष्णोदेवी अशी हेलिकॉप्टरची बुकिंग आम्ही केली होती. परंतु बुकिंग करणाऱ्या पोराने येऊन आम्हाला सांगितले की, आम्ही बाहेर पाहतो तर काय तावी नदीने तिचे पात्र सोडलेले होते. पुराचे रौद्ररूप पाहून आमचा थरकाप उडाला.
दिनेश चव्हाण म्हणाले, ४० सूटच्या रिसॉर्टमध्ये पाहुणे पर्यटक मोठ्या प्रमाणात उतरलेले होते. त्यामुळे पहिल्या दिवशीच हॉटेलच्या किचनमध्ये तुटवडा निर्माण झाला. आम्ही घरच्या शिदोऱ्यावर दुसरा दिवस ढकलला. नंतरचे दोन दिवस मात्र अर्धपोटीच काढावे लागले. परंतु भुकेची जाणीव नव्हतीच. नजर बाहेरून वाहणाऱ्या नदीवर जायची अन् थरकाप व्हायचा. दोन दिवसांनंतर तर ही जाणीवही काहीशी बोथट झाल्याचे जाणवत होते. हॉटेलातून जिवानिशी बाहेर पडण्याची संधी मिळणार की नाही, याची शाश्वती वाटत नव्हती.
नारायण घोडके म्हणाले, मुसळधार पाऊस संततधार कोसळत होता. परंतु पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. सतत तीन दिवस एकाच लयीत, विनाविश्रांती कोसळणारा पाऊस आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो.
निसर्ग कोपल्याने नंदनवनात अडकून पडलेल्या सर्वांनी स्मशान व विकट शांतता अनुभवली. घोडके, चव्हाण यांचा रक्तदाब अनेकदा वाढला. परंतु काहीच उपाय नव्हता. दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी लष्कराचे जवान हॉटेलात पोहोचले. त्यांनी बाहेरच्या पर्यटकांची हेलिकॉप्टरच्या साह्याने सुटका करणे सुरू केले.
नंतर या आठ जणांसह इतरांना लष्कराच्या विशेष गाड्यांनी जम्मूपर्यंत आणण्याची मोहीम सुरू झाली. जम्मूहून कटराला जाताना सुंदर दिसणारा रस्ता आता पार गायब झाला होता. जागोजागी माती येऊन भराव झाले होते, तर काही ठिकाणी खड्डे. पुराने हा रस्ता जागोजागी वाहून नेला होता. त्यामुळे लष्कराने पोकलेन, जेसीबी अशी यंत्रणा या ताफ्यासोबत घेतली होती.
पोकलेन, जेसीबी पुढे - पुढे चालत रस्ता तयार करीत होते व मागून या पर्यटकांना वाट मोकळी करून देत होते. या पथकाने कसेबसे जम्मू गाठले. तेथून विमानाने दिल्ली गाठल्यावर कुठे त्यांच्या चेहऱ्यावर स्मित खुलले.
प्रीपेड बंद, संवाद थांबला...
भारताच्या या नंदनवनात दहशतवाद्यांना पायबंद घालण्यासाठी प्रीपेड मोबाईलची सुविधा बंद करण्यात आली आहे. शहरातून जम्मूला गेलेल्या ८ पैकी ७ जणांकडे प्रीपेड कार्ड मोबाईल होते. काश्मीरच्या हद्दीत प्रवेश करताच सात जणांचे मोबाईल नेटवर्क बंद झाले.
मोबाईल टॉवरही बंद पडले. त्यामुळे या सर्वांचाच दोन दिवस कुटुंबियांशी संवाद होऊ शकला नव्हता.
फक्त नारायण घोडके यांचा प्रीपेड मोबाईल तेवढा सुरू होता. त्यामुळे सर्वांचेच कॉल या एकाच फोनवरून सुरू झाले. सततच्या पावसाने काश्मीरचा वीजपुरवठा खंडित झाला.