खळबळजनक ! पशुधन पर्यवेक्षकाला खाटीक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कत्तलखान्यात कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 15:03 IST2020-08-05T15:00:59+5:302020-08-05T15:03:48+5:30
पोलिसांनी सुटका केल्यानंतर शेख यांनी सिटीचौक पोलिसांत तक्रार नोंदविली.

खळबळजनक ! पशुधन पर्यवेक्षकाला खाटीक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कत्तलखान्यात कोंडले
औरंगाबाद : अवैध कत्तल विरोधी पथक पाठवून खाटकांना त्रास देता, पशुकत्तल फी का वाढविली, असे म्हणत खाटीक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना कत्तलखान्यात कोंडल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी शहाबाजार येथे घडली. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
समीर जावेद कुरेशी, युसूफ कुरेशी, फेरोज महेबूब कुरेशी, राऊफ कुरेशी, मोहम्मद शफी सुभान कुरेशी, शौकत चाँद कुरेशी, मोहसीन समद कुरेशी, इमरान रहेमान कुरेशी आदींचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. महापालिकेचे पशुधन पर्यवेक्षक शेख शाहेद शेख निजाम हे कर्मचाऱ्यांसह मंगळवारी सकाळपासून शहाबाजार येथील कत्तलखान्यावर काम करीत होते. यावेळी अचानक आरोपी तेथे आले. समीरने तो खाटीक संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, अवैध कत्तल विरोधी पथक पाठवून खाटकांना त्रास देता, कत्तल शुल्क का वाढविले, हे शुल्क कमी करा, असे म्हणून त्याने वाद घालण्यास सुरुवात केली.
अवैध कत्तल विरोधी पथक पाठवणे हे आपले कामच असल्याचे आणि कत्तल शुल्क वाढविण्याचा निर्णय मनपा सर्वसाधारण सभेने घेतला आहे, असे समजावून सांगत असताना आरोपींनी शेख शाहेद आणि त्यांच्या सोबतच्या पथकाला कत्तलखान्यात कोंडून बाहेरून कुलूप लावले. पोलिसांनी सुटका केल्यानंतर शेख यांनी सिटीचौक पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिसांनी केले मुक्त
वारंवार विनंती करूनही आरोपींनी कत्तलखान्याचे दार न उघडल्याने शेवटी शहा यांनी पोलिसांना फोन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी पवार आणि कर्मचाऱ्यांनी शहाबाजार येथे धाव घेऊन मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुटका केली.