खळबळजनक ! जादूटोण्याच्या संशयातून दिव्यांगाचा दगडाने ठेचून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 17:09 IST2020-10-28T17:01:11+5:302020-10-28T17:09:00+5:30
आरोपीने दिव्यांगाला कुबडीने मारहाण करत जखमी करून नंतर दगडाने ठेचले

खळबळजनक ! जादूटोण्याच्या संशयातून दिव्यांगाचा दगडाने ठेचून खून
करमाड : जादूटोण्याच्या संशयातून एका दिव्यांग व्यक्तीला दगडाने ठेचून जीवे मारल्याची खळबळजनक घटना करमाड शिवारातील दर्गा परिसरात बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आली. ज्ञानेश्वर आसाराम गडकर ( ४८ रा. सावित्रीनगर, चिकलठाणा ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भाऊसाहेब सदू शेजवळ (रा.कुंभेफळ ता.औरंगाबाद ) या आरोपीस पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.
ज्ञानेश्वर गडकर हे एका पायाने अधू होते. यामुळे ते कुबडीच्या सहाय्याने चालत असत. भाऊसाहेब शेजवळ याचा गडकर यांनी त्याच्यावर जादूटोणा केल्याचा संशय होता. यातून औरंगाबाद-जालना रोडपासून अवघ्या ५० फूट अंतरावर असलेल्या दर्ग्याजवळ गडकर आणि शेजवळ यांच्यात बुधवारी सकाळी वाद झाला. यानंतर शेजवळ याने गडकर यांच्यावर त्यांच्याच कुबडीने हल्ला केला. जबर हल्ल्यात कुबडी तुटल्यानंतर शेजवळ याने गडकर यांच्यावर दगडाने हल्ला केला. यात गडकर जबर जखमी झाले. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गडकर यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.
आरोपीस घटनास्थळावरून घेतले ताब्यात
ही घटना औरंगाबाद - जालना या मुख्य रोडपासून अवघ्या काही फुटांवर घडली. याची माहिती करमाड पोलिसांना मिळताच पेट्रोलिंगवर असलेले पोऊनी सुशांत सुतळे व चालक अजिनाथ उकर्डे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी भाऊसाहेब शेजवळ घटनास्थळीच होता. त्याने पोलिसांना पाहताच पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुतळे यांनी पाठलाग करून शेजवळला ताब्यात घेतले. घटनास्थळी करमाड पोलीस ठाण्याचे पोनी संतोष खेतमाळस, सापोनि प्रशांत पाटील यांनी भेट दिली.