फोटो काढण्यात सर्वजण गुंतल्याची संधी साधत विवाह समारंभातून पळविला अहेराचा डबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:37 IST2019-05-15T20:36:57+5:302019-05-15T20:37:45+5:30
नवरी-नवरदेवासोबत फोटो काढणे पडले महागात

फोटो काढण्यात सर्वजण गुंतल्याची संधी साधत विवाह समारंभातून पळविला अहेराचा डबा
औरंगाबाद : बायपासवरील सावित्री लॉन येथे विवाह समारंभात नवरदेव-नवरीसोबत फोटो काढण्यासाठी उभे राहिले अन् संधी साधून चोरट्यांनी १ लाख १० हजारांच्या रकमेचा डबाच पळविल्याची घटना रविवारी दहा वाजेच्या सुमारास घडली.
सोमीनाथ संतू सिरसाट रा. पिसादेवी यांनी सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलाचा विवाह समारंभ असल्याने पाहुण्यांनी नवरदेवाला दिलेली भेट रक्कम (अहेर) वहीवर लिहून एका स्टीलच्या डब्यात ठेवण्यात आला होता.
नवरदेव- नवरी स्टेजवर आल्याने त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सिरसाटच्या पत्नी व पुतण्याने अहेराचा डबा हॉलमध्ये ठेवला होता. फोटो काढण्यात सर्वजण गुंतलेले होते. त्यावेळी चोरट्याने सर्वांची नजर चुकवून डबा पळविला. ही बाब लक्षात आल्यावर एकच गडबड सुरू झाली, सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो डबा कुणालाही सापडला नाही. डब्यात एक लाख दहा हजारांची रक्कम होती, असे सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
फुटेज तपासणे सुरू
हॉलमध्ये ठेवलेला अहेराचा डबा नेमका कुणी पळविला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी फुटेज हस्तगत केले आहे. त्याचा तपास सुरू असल्याचे पोहेकॉ. शेषराव चव्हाण यांनी सांगितले.