प्रत्येक शाळेत ‘ग्रीन स्काय क्लब’ करणार
By Admin | Updated: January 17, 2016 00:05 IST2016-01-16T23:33:09+5:302016-01-17T00:05:12+5:30
औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गचक्राविषयी जनजागृती निर्माण करणे. जीवसृष्टीचा ऱ्हास टाळण्यासाठी पक्ष्यांना वाचविणे गरजेचे

प्रत्येक शाळेत ‘ग्रीन स्काय क्लब’ करणार
औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गचक्राविषयी जनजागृती निर्माण करणे. जीवसृष्टीचा ऱ्हास टाळण्यासाठी पक्ष्यांना वाचविणे गरजेचे असून, यासंदर्भात मोठ्या प्रमाणात पक्षीमित्र निर्माण होण्यासाठी येत्या वर्षात प्रत्येक शाळेत ‘ग्रीन स्काय क्लब’ स्थापन करण्याचा निर्णय घेऊन तिसऱ्या पक्षी महोत्सवाची सांगता झाली.
पक्ष्यांच्या अनेक जाती काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. समाजात जागृती नसल्याने पक्ष्यांविषयी जास्त बोलले जात नाही. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना निसर्गचक्र कायम राखण्यात पक्ष्यांची किती महत्त्वपूर्ण भूमिका आहे याची जाणीव करून दिली, तर भविष्यात निश्चितच पक्षीमित्रांची संख्या वाढेल. पक्ष्यांना मारण्याऐवजी त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जाईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पक्षी निरीक्षण, पक्षी ओळखा स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले. समारोपप्रसंगी सीआयआयचे अध्यक्ष एन. श्रीराम, विभास आमनकर, राजू कोसुंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. दिलीप यार्दी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग व पक्षी, प्राण्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आता पुढील वर्षात विधायक कार्य हाती घेण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक शाळेत ‘ग्रीन स्काय क्लब’ स्थापन करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पक्षी विश्वाची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय पक्षी विषयावरील चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धाही घेण्यात येणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांमध्ये पक्षीप्रेम वाढण्यासाठी दर महिन्यात एका रविवारी वनजीवावरील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यावर चर्चा घडवून आणण्यात येईल, असेही यार्दी यांनी यावेळी जाहीर केले. सूत्रसंचालन किरण परदेशी यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थी व पक्षीप्रेमी हजर होते.
पक्षी ओळखण्याची स्पर्धा गाजली
असंख्य प्रकारचे पक्षी आहेत. प्रत्येक पक्ष्याचा रंग, शरीर, त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात, याची शालेय विद्यार्थ्यांना कितपत माहिती आहे. हे जाणून घेण्यासाठी पक्षी महोत्सवात ‘पक्षी ओळखा’ स्पर्धा घेण्यात आली. या नावीन्यपूर्ण स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत नाथ व्हॅली हायस्कूल (प्रथम), मुकुल मंदिर प्रशाला (द्वितीय), जि.प. मुलींची शाळा, पैठण व स्वामी विवेकानंद अकॅडमी (तृतीय), तर एसबीओए व धर्मवीर संभाजी विद्यालयाने चौथ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत धोंड यांनी केले.
पक्ष्यांसोबतच पक्षी निरीक्षकांचीही संख्या वाढली
दुष्काळामुळे जिल्ह्यातील लहान-मोठी तळी आटल्यामुळे सर्व पक्षी उपजीविकेसाठी जायकवाडी जलाशयात आले आहेत. शनिवारी सकाळी पक्षी महोत्सवानिमित्त जायकवाडी जलाशय परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले. जशी पक्ष्यांची संख्या वाढली तशीच यंदा पक्षी निरीक्षकांची संख्याही वाढल्याचे दिसून आले. मागील वर्षी बोटावर मोजण्याइतकेच पक्षीमित्र पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी आले होते. आज सुमारे १५० जण पक्षी निरीक्षणासाठी येथे जमले होते. देशी व विदेशी पक्षी मनसोक्त विहार करीत होते. ते दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची अनेकांची धडपड सुरू होती. बहुतांश पक्षीमित्रांनी दुर्बिणीतून पक्षी निरीक्षण केले. पक्षीमित्रांना दिलीप यार्दी, विभास अमोनकर, राजीव कुसुंबे, श्रवण परळीकर, बी.यू. पाठक आदींनी माहिती दिली.