"प्रत्येक श्रीमंत व्यक्ती गरिबाचा कर्जदार!"; रमजान ईदपूर्वी जकात-फितरा वाटपाचा मोठा उत्साह, असा आहे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:17 IST2026-03-20T19:16:37+5:302026-03-20T19:17:45+5:30

छत्रपती संभाजीनगरमध्ये जकात आणि फितरा वाटपास प्रारंभ; जाणून घ्या सामाजिक समतोलाचा 'इस्लामी' नियम

"Every rich person is a debtor to the poor!"; How Zakat and Fitra Concepts in Islam Support the Needy During Ramzan | "प्रत्येक श्रीमंत व्यक्ती गरिबाचा कर्जदार!"; रमजान ईदपूर्वी जकात-फितरा वाटपाचा मोठा उत्साह, असा आहे नियम

"प्रत्येक श्रीमंत व्यक्ती गरिबाचा कर्जदार!"; रमजान ईदपूर्वी जकात-फितरा वाटपाचा मोठा उत्साह, असा आहे नियम

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक श्रीमंत व्यक्ती एका गरीब व्यक्तीचा कर्जदार आहे, हे ऐकून थोडे आश्चर्य वाटेल. चौदाशे वर्षांपूर्वी इस्लामने प्रत्येक श्रीमंत व्यक्तीला गरिबाचा कर्जदार बनविले. ज्यांच्यावर जकात ‘फर्ज’ आहे, त्यांनी ती अदा केल्यावर त्यांची मुक्तताच होऊ शकत नाही. समाजात श्रीमंत आणि गरीब ही दरी वाढू नये म्हणून ‘जकात’ची संकल्पना राबविण्यात येते. यंदाही पारंपरिक पद्धतीने जकात आणि फितरा वाटपाचे काम सुरू झाले आहे.

रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांवर ‘जकात आणि फितरा’ वाटणे बंधनकारक असून, यंदाही मोठ्या प्रमाणात जकात आणि फितरा वाटप होत आहे. जकात व फितरा म्हणजे काय, यासंदर्भात मौलाना रशीद मदनी यांनी सांगितले की, इस्लाममध्ये जकात अदा करणे हे प्रत्येक श्रीमंत व्यक्तीला बंधनकारक आहे. ज्याच्याकडे साडेसात तोळे सोने किंवा त्याच्या किमतीएवढा पैसा (मालमत्ता) असल्यास त्यातील अडीच टक्के रक्कम जकात म्हणून गरिबांमध्ये वाटप करावी असे आदेश आहेत. याच हिशेबाने दरवर्षी रमजान महिन्यात जकात वाटप होते. जकातची ही रक्कम अगोदर रक्ताच्या नात्यात कोणी गरीब असेल तर त्याला द्यावी, नसेल तर अन्यत्र द्यावी.

फितरा म्हणजे काय?मौलाना रशीद मदनी यांनी सांगितले की, रमजान महिन्यात ईदच्या नमाजपूर्वी फितरा वाटप झाला पाहिजे. घरातील एक दिवसाच्या बाळाच्या नावाने ‘जान का सदखा’ म्हणून फितरा वाटप केला जातो. आपण दररोज खात असलेले धान्य वाटप करण्याचे आदेश आहेत. घरातील एका व्यक्तीसाठी सुमारे दोन किलो धान्य गरिबांना द्यावे. एखाद्या गरिबाला धान्य नको असल्यास त्याला पैशाची गरज व्यक्त केल्यास त्याला पैसे द्यावेत. रमजान महिन्यात शेवटचा रोजा असेल आणि त्या दिवशी इफ्तार पूर्वी घरात बाळ जन्माला आले असेल तर त्याच्या नावानेही फितरा वाटप करावे लागते. इफ्तार नंतर बाळाचा जन्म झालेला असल्यास त्याच्या नावाने फितरा देता येत नाही. सामाजिक समतोल कायम राहावा, यासाठी जकात आणि फितरा याची संकल्पना अंमलात आणली आहे.

Web Title: "Every rich person is a debtor to the poor!"; How Zakat and Fitra Concepts in Islam Support the Needy During Ramzan