‘ हर घर दस्तक ’, औरंगाबादने ओलांडला १० लाख लसीकरणाचा टप्पा; मनपाकडून लसीकरण मोहिमेला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 19:02 IST2021-11-13T19:00:22+5:302021-11-13T19:02:47+5:30
Aurangabad Municipal Corporation: ३० नोव्हेंबरपर्यंत ८० टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी आरोग्य विभागाने काम सुरू केले असून, शहरात दररोज आठ ते दहा ठिकाणी शिबिर घेण्यात येत आहे.

‘ हर घर दस्तक ’, औरंगाबादने ओलांडला १० लाख लसीकरणाचा टप्पा; मनपाकडून लसीकरण मोहिमेला वेग
औरंगाबाद : केंद्र आणि राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्याला लसीकरणाचा (Corona Vaccination in Aurangabad ) वेग वाढविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक उपाययोजना करण्यास सुरूवात केली असून, शुक्रवारी पहिला आणि दुसरा डोस मिळून १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शंभर टक्के लसीकरणासाठी ‘ हर घर दस्तक ’ मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
३० नोव्हेंबरपर्यंत ८० टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी आरोग्य विभागाने काम सुरू केले असून, शहरात दररोज आठ ते दहा ठिकाणी शिबिर घेण्यात येत आहे. शुक्रवारी खडकेश्वर मंदिर, हर्सूल कारागृह, पटेल क्लिनिक फातेमानगर हर्सूल, साकोळकर हॉस्पिटल, आंबेडकरनगर, मकबरा आदी ठिकाणी ९८८ नागरिकांनी लस घेतली. शनिवारी हर्सूल येथे दोन ठिकाणी, अंबिकानगर, बायजीपुरा, मिसारवाडी, सातारा, हर्षनगर आरोग्य केंद्रांमध्ये शिबिर आयोजित केले आहेत.
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ‘ हर घर दस्तक ’ मोहीम राबविण्यात येत आहे. ८ नोव्हेंबरपासून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यात आतापर्यंत २३ हजार १५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. १२ नोव्हेंबर रोजी ९ हजार १४२ घरांचे सर्वेक्षण केले. त्यात एकही डोस न घेतलेले तब्बल ५ हजार ५५८ महिला, ५ हजार ८७४ पुरुष आढळून आले. पहिला डोस घेतलेले १० हजार ५ व दुसरा डोस घेतलेले ७ हजार ५७५ नागरिक आढळून आले. दुसरा डोस न घेतलेल्या १४०४ महिला आणि १३२० पुरुषांना लसीकरणासाठी पाठविण्यात आले. त्यातील ९२३ नागरिकांनी पहिला तर ४२६ जणांनी दुसरा डोस घेतला.
४६ जणांना प्रवेश नाकारला
महापालिका मुख्यालयात दोन लस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात येत आहे. लस न घेतलेल्या ४६ जणांना शुक्रवारी प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.