दुसरे सत्र सुरू, तरी ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेल प्रवेश नाही; निवास-भोजनासाठी फरपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:29 IST2025-11-08T17:19:28+5:302025-11-08T17:29:37+5:30
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम; ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची प्रवेशप्रक्रिया लटकली

दुसरे सत्र सुरू, तरी ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेल प्रवेश नाही; निवास-भोजनासाठी फरपट
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे इतर मागासवर्गीय कल्याण विभागाच्या वसतिगृहांसाठी अर्ज करण्यास शासनाने मुदतवाढ दिली. परिणामी, चालू शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले असतानाही या वसतिगृहांच्या प्रवेश प्रक्रियेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शहरात गतवर्षीपासून दोन वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. मुलींसाठी रेल्वेस्टेशनजवळील बालभारती कार्यालय परिसरात, तर मुलांसाठी गरवारे स्टेडियमजवळ अशी स्वतंत्र वसतिगृहे उपलब्ध आहेत. प्रत्येकी शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या दोन्ही वसतिगृहांत मागील वर्षी २००पैकी १३८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. यंदा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पोर्टल ऑगस्टपासून कार्यान्वित आहे. आतापर्यंत या दोन्ही वसतिगृहांसाठी सुमारे १ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यांची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
भाडेतत्त्वावरील इमारतीत वसतिगृहे
सध्या ही दोन्ही वसतिगृहे भाडेतत्त्वावरच्या इमारतींमध्ये सुरू आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरांकडे येतात. मात्र, निवास, भोजन आणि इतर मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करण्याची मागणी विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संस्थांकडून सातत्याने केली जात होती.
राज्यात ७२ वसतिगृहे सुरू
या मागणीनंतर सन २०२२च्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या प्रवर्गातील मुला - मुलींसाठी प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेची वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ७२ वसतिगृहे गतवर्षीपासून कार्यान्वित करण्यात आली आहेत. या वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय, अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गतवर्षी ऑफलाइन प्रक्रिया
गतवर्षी या वसतिगृहांसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. २० ऑगस्ट २०२४ रोजी प्रवेशाची अंतिम यादी जाहीर झाली होती. २०० क्षमतेपैकी १३८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, त्यामध्ये ६४ मुलगे व ७२ मुली होत्या.