माजी सैनिकाचे निधन झाले तरीही हक्काची जमीन मिळेना; पत्नीचा जीवन संपविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 19:17 IST2025-03-13T19:14:05+5:302025-03-13T19:17:25+5:30
प्रशासनाकडून सातत्याने अवहेलना : कमल खरात यांना १९९७ पासून न्याय नाही

माजी सैनिकाचे निधन झाले तरीही हक्काची जमीन मिळेना; पत्नीचा जीवन संपविण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : माजी सैनिक पत्नीला सीलिंग जमीन दिली होती. जी जमीन दिली ती खाजगी निघाली. सदरील महिला जमीन मागण्यासाठी रोज हेलपाटे मारून वैतागली. त्यातून आज अंगावर डिझेल ओतून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. वेळीच त्यांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
माजी सैनिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे व त्यांना रीतसर त्यांच्या हक्काचा जमिनीचा ताबा देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आत्मदहन करण्याचा इशारा भारतीय माजी सैनिक संघटनेने बुधवारी पत्रपरिषदेत दिला होता. कमल खरात या माजी सैनिकाच्या विधवा पत्नीस १९९७ पासून जमिनीच्या बाबतीत न्याय मिळाला नाही. दरवेळी त्यांना प्रशासनाचे लोक गोड बोलून त्यांना वाटे लावून देतात. वारंवार आत्मदहनाचे प्रयत्न करूनही व उपोषणे करूनही प्रशासन त्यांची दादही घेत नाही व दखलही घेत नाही, असा आरोप कमल खरात यांनी केला.
वेगवेगळे निकाल माझ्या बाजूने असूनही मला माझ्या जमिनीचा ताबा देण्यात येत नसल्याची तक्रार त्यांनी केली. कमल खरात यांचे पती भगवान खरात हे यांनी सैन्यात सेवा केली होती. २००७ साली त्यांचे निधन झाले. जमिनीचा ताबा देण्यात यावा म्हणून आज कमाल खरात यांनी टोकाचा निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच अंगावर डिझेल टाकून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, प्रशासन त्यांच्या जमिनीबाबत सोमवारी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आणखी एक असेच प्रकरण
दुसरे असेच प्रकरण दादासाहेब काशीनाथ आदमाने यांचे आहे. तेही यावेळी उपस्थित होते. मौजे अंभई येथील सर्व्हे नं. १६० येथे पाच एकर जमीन त्यांना प्रदान करण्यात आली होती. त्यांचे वडील काशीनाथ आदमाने यांनी भारतीय सैन्यात २२ वर्षे सेवा केली होती. परंतु आदमाने यांना अद्यापही जमिनीचा ताबा देण्यात आलेला नाही. तेही आत्मदहन करण्याच्या विचारात आहेत.