दहा लाखांच्या कामासाठी दीड लाख घेऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांची हाव संपली नाही
By सुमित डोळे | Updated: July 11, 2024 19:37 IST2024-07-11T19:36:53+5:302024-07-11T19:37:03+5:30
कन्नडला ‘बडे मासे’ जाळ्यात : एक लाख रुपये घेताना कार्यकारी अभियंता, उपव्यवस्थापक दालनातच चतुर्भूज

दहा लाखांच्या कामासाठी दीड लाख घेऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांची हाव संपली नाही
छत्रपती संभाजीनगर : रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) च्या केलेल्या चार कामांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून १ लाखांची लाच घेताना महावितरणचा कन्नडचा कार्यकारी अभियंता धनाजी रामुगडे व उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर (रा. पडेगाव) हे दोघे रंगेहात पकडले गेले. एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) ने बुधवारी रामुगडेच्या दालनातच सापळा रचून दोघांना अटक केली. विशेष म्हणजे, यापूर्वी दोघांनी ठेकेदाराकडून दीड लाख रुपये घेतले होते. मात्र, तरीही त्यांची हाव संपली नाही व ते सापळ्यात अडकले.
ठेकेदाराने काही दिवसांपूर्वी कन्नड विभागातील महावितरणच्या रोहित्राची चार कामे केली होती. त्या कामांचे प्रस्ताव मंजूर करून बिलाच्या अंतिम परवानगीसाठी रामुगडे व दिवेकर यांनी साडेतीन लाखांची मागणी केली. ठेकेदाराने त्यांना दीड लाख रुपये दिले. आरोपींनी ते पैसे मिळाल्यानंतर दोन कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले. उर्वरित दोन कामांसाठी पुन्हा दोन लाखांची मागणी करून त्रास दिला. अखेर ठेकेदाराने मंगळवारी थेट एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटोळे यांच्या सूचनेवरून निरीक्षक अमोल धस यांनी खातरजमा केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
रूमाल लटकवण्याचा इशारा
आरोपींनी आधी घेतलेल्या दीड लाखाचे पुरावे एसीबीला मिळाले. मंगळवारी उशिरा तडजोडीअंती रामुगडे १ लाखांवर तयार झाला. ठेकेदाराला त्याने दालनातच पैसे घेऊन येण्यास सांगितले. बुधवारी दुपारी निरीक्षक अमोल धस, अंमलदार युवराज हिवाळे, रवींद्र काळे, आत्माराम पैठणकर, सी. एन. बागूल यांनी महावितरण कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराला रूमाल लटकवण्याचा इशारा सांगण्यात आला होता. पैशांच्या लालसेने दिवेकर आधीच दालनात बसलेला होता. ठेकेदाराने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पथकाने दालनात घुसून दोघांना उचलले.
इकडे अटक, तिकडे ठाण्यात छापे
वर्ग एकचा अधिकारी असलेल्या रामुगडेला जवळपास दीड तर दिवेकरला १ लाख रुपये पगार आहे. बुधवारी दोघांना अटक होताच दिवेकरच्या पडेगावच्या घरी झाडाझडती सुरू झाली. मूळ ठाण्याचा असलेल्या दिवेकरच्या घरी ठाणे येथील एसीबी पथकाने छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत घरातील संपत्ती, दागिने, कागदपत्रांची छाननी सुरू होती.