महिनाभरानंतरही ‘सॅप’ बद्दल व्यापारी अनभिज्ञच
By Admin | Updated: April 30, 2016 00:07 IST2016-04-29T23:33:38+5:302016-04-30T00:07:20+5:30
औरंगाबाद : राज्य सरकारने व्हॅटच्या रिटर्नमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. यासाठी महाव्हॅटची नवीन सॉफ्टवेअर प्रणाली ‘सॅप’(एसएपी) १ एप्रिलपासून लागू केली आहे.

महिनाभरानंतरही ‘सॅप’ बद्दल व्यापारी अनभिज्ञच
औरंगाबाद : राज्य सरकारने व्हॅटच्या रिटर्नमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. यासाठी महाव्हॅटची नवीन सॉफ्टवेअर प्रणाली ‘सॅप’(एसएपी) १ एप्रिलपासून लागू केली आहे. याद्वारे आता व्यापाऱ्यांना खरेदी व विक्री यांची बिलनिहाय माहिती विभागाला द्यावी लागणार आहे. रिटर्न दाखल करण्याच्या या नवीन नियमाबद्दल मात्र, अजूनही व्यापारी करदाता अनभिज्ञ आहे. यावर कहर म्हणजे ही प्रणाली लागू झाल्यानंतर आता विक्रीकर विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी मुंबईला पाठविण्यात आले आहे.
विक्रीकर विभागाचे रिटर्नस् वर्षानुसार तपासले जात होते. नंतर टीन टू टीन नंबरनुसार तपासले जात होते व आता बिल टू बिलनुसार तपासले जातील. प्रत्येक बिलाची कोडनिहाय माहिती द्यावी लागेल. यामुळे जे व्यापारी, उद्योजक १० लाखांपेक्षा अधिक कर भरतात, त्यांना दर महिन्याला खरेदी-विक्रीची सखोल माहिती रिटर्न दाखल करताना द्यावी लागणार आहे. परिणामी करदात्याला हिशोबाची पुस्तके सतत अद्ययावत ठेवावी लागणार आहेत. १ एप्रिलपासून ‘सॅप’ प्रणाली लागू झाली आहे. करदात्यांना १ ते ३० एप्रिल या महिन्याचे बिल टू बिल रिटर्न २१ मेपर्यंत दाखल करावे लागणार आहे. ‘सॅप’ लागू होऊन २९ दिवस झाले; पण अजूनही प्रत्यक्षात जो कर भरतो, त्यास याची संपूर्ण माहिती मिळाली नाही. विक्रीकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मासिक रिटर्न भरणाऱ्या ८८२ व्यापारी, उद्योजक करदात्यांना ‘सॅप’ संगणक प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. तसेच त्रैमासिक रिटर्न भरावा लागणाऱ्या करदात्यांनाही या प्रणालीचा वापर करावा लागेल. उल्लेखनीय म्हणजे कोणतीही कर प्रणाली लागू करताना किंवा नवीन बदल घडवून आणताना कमीत कमी ६ महिने आधी त्यासंदर्भात अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असते. मात्र, सॅप लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाला मुंबईत पाठविण्यात आले आहे.
यात विक्रीकर विभागाचे ३ उपायुक्त, सहायक आयुक्त व विक्रीकर निरीक्षक, असे १० ते १२ जण सध्या मुंबईत प्रशिक्षण घेत आहेत.