तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू थुंकणाऱ्या पुजाऱ्यांना प्रवेशबंदी; संस्थानचा कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:52 IST2025-07-04T13:47:03+5:302025-07-04T13:52:48+5:30
तुळजाभवानी मंदिर परिसरात ८ पुजाऱ्यांनी तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याची बाब उघडकीस आली होती.

तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू थुंकणाऱ्या पुजाऱ्यांना प्रवेशबंदी; संस्थानचा कारवाईचा बडगा
तुळजापूर (जि.धाराशिव) : तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबद्दल मंदिर संस्थानकडून गुरुवारी ८ पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तत्पूर्वी त्यांना नोटिसा देऊन खुलासा मागविण्यात आला होता. तो समाधानकारक न वाटल्याने मंदिर संस्थानने पुजाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
तुळजाभवानी मंदिर परिसरात ८ पुजाऱ्यांनी तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याची बाब उघडकीस आली होती. मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला होता. त्यातून मंदिराची स्वच्छता व पावित्र्य भंग होत असल्याने मंदिर संस्थानने आठही पुजाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविला होता. दरम्यान, यातील लखन रोहिदास भोसले, अक्षय किशोर कदम-भैय्ये, विशाल हनुमंत चव्हाण, धीरज राजू चोपदार, वैभव खुशालराव भोसले, राहुल हनुमंत पवार या सहाजणांनी मंदिर संस्थानकडे माफीनामा सादर केला होता. त्यानुसार संस्थानने या सर्वांना १ महिन्यासाठी मंदिर प्रवेशबंदी केली आहे. तर विशाल दादासाहेब मगर व विशाल बाळासाहेब गंगणे या दोघांनी नोटिसीला कोणतेही उत्तर न दिल्याने त्यांच्यावर ३ महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली.
देऊळ कवायत कायद्यानुसार कारवाई
संबंधित पुजाऱ्यांना अशोभनीय व मंदिराच्या शिस्तीस बाधा आणणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण करणारे वर्तन करण्यास जबाबदार ठरवण्यात आले आहे. ही बाब मंदिराच्या देऊळ कवायत कायदा १९०९ च्या कलम २४ व २५ चे उल्लंघन करणारी ठरत असल्याने त्यानुसार प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली.
मंदिराचे पावित्र्य राखावे
तुळजाभवानी मंदिरात तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने आठ पुजाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यातील सहा पुजाऱ्यांनी माफीनामा दिल्याने त्यांना १ महिन्यांसाठी तर उत्तर न देणाऱ्या दोघांना ३ महिन्यांच्या कालावधीसाठी मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी भाविकांसह पुजाऱ्यांनीही धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ मंदिरात टाळावेत.
-अरविंद बोळंगे, व्यवस्थापक तहसीलदार, तुळजाभवानी मंदिर संस्थान.