आठ हजारांची लाच घेताना अभियंता पकडला; ‘एसीबी’ची पंचायत समिती कार्यालयात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:03 IST2025-11-08T18:02:02+5:302025-11-08T18:03:02+5:30
याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

आठ हजारांची लाच घेताना अभियंता पकडला; ‘एसीबी’ची पंचायत समिती कार्यालयात कारवाई
छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्याने रोहयो अंतर्गत बनविलेल्या विहिरीच्या कुशल कामाचे १ लाख ७१ हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती मधील तांत्रिक अधिकारी (इंजिनिअर) आकाश बाबूराव आंबेगावे (मूळ रा. समुठाणा, ता. उदगीर, जि. लातूर) यास ८ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पंचायत समितीमध्ये पकडले. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी दिली.
आंबेगावे याच्याकडे तालुक्यातील लामकाना गावातील एका शेतकऱ्याने योजनेंतर्गत खोदलेल्या विहिरीचे एकूण ४ लाख रुपयांचे बिल होते. त्यातील अकुशल कामाचे २ लाख २९ हजार रुपयांचे बिल मिळाले. त्याच वेळी कुशल कामाचे १ लाख ७१ हजार रुपयांचे बिल प्रलंबित होते. हे बिल काढून देण्यासाठी शेतकऱ्यास १५ हजार रुपये लाच मागण्यात आली. तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याचे शेतकऱ्याने मान्य केले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, शांतीलाल चव्हाण, अंमलदार सचिन बारसे, राजेंद्र नंदिले, सी.एन. बागूल यांनी पंचायत समितीमध्ये सापळा रचला. त्यात आंबेगावे ८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. त्यास पथकाने ताब्यात घेतले. आरोपीच्या विरोधात सिटी चौक पोलिस गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपीच्या घराची झडती
आरोपी आंबेगावेच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यात किती मुद्देमाल सापडला, याविषयी माहिती मिळू शकली नाही. ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.