जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच हत्तेसिंगपुऱ्यातील शत्रू संपत्ती नोंद रद्द, खाजगी नावे लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:41 IST2025-11-12T16:41:02+5:302025-11-12T16:41:41+5:30
सुनावणी एकतर्फी घेतल्याने संशयकल्लोळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच भूमी अभिलेख विभागाने घेतला शत्रू संपत्तीबाबतचा निर्णय

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच हत्तेसिंगपुऱ्यातील शत्रू संपत्ती नोंद रद्द, खाजगी नावे लावली
छत्रपती संभाजीनगर : शहरातील हत्तेसिंगपुरा येथील सर्व्हे क्रमांक ३०/१ वरील शत्रू संपत्ती म्हणून प्रशासनाने घेतलेली नोंद रद्द करून खासगी नावे पुन्हा पीआर कार्डवर लावली असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या परवानगीविनाच त्या शत्रू संपत्तीबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने अपर तहसीलदार व अन्य कुणीही हजर नसताना सुनावणी एकतर्फी घेत निर्णय घेतल्याने या प्रकरणात संशयकल्लोळ वाढला आहे.
गृह मंत्रालयाच्या एनीमी प्रॉपर्टी (शत्रू संपत्ती) असिस्टंट कस्टोडियनने २९ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र पाठविले होते. त्याची प्रत भूमी अभिलेख अधीक्षक डॉ. विजय वीर व नगर भूमापन विभागाला दिली होती. मूळ पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली असताना ते किंवा त्यांच्या प्रतिनिधींना काहीही माहिती न देता जिल्हा अधीक्षक डॉ. विजय वीर यांनी अपिलार्थींचे अपील मंजूर केल्याचे सूत्रांनी सांगितले.
शत्रू संपत्ती म्हणजे काय...
देशाच्या फाळणीवेळी देश सोडून गेलेल्यांची मालमत्ता केंद्र शासनाकडून शत्रू संपत्ती (एनिमी प्रॉपर्टी) घोषित करून त्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाचे नाव लावले गेले. शहरात हत्तेसिंगपुरा व काही ठिकाणी शत्रू संपत्ती आहे. २००९ साली २२ पैकी १६ एकर ९७ गुंठे जमिनीवरील पीआर कार्ड रद्द करून ही जागा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नावे करण्यात आली. उर्वरित ५ एकर २५ गुंठे जागेची मोजणी करून ती गृहमंत्रालयाच्या नावावर करण्याचे केंद्र शासनाने आदेशित दिले होते. त्यानुसार फेब्रुवारी २०२३ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्या जमिनीबाबतचे पीआर कार्ड रद्द करून त्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाचे नाव लावले होते. दरम्यान, सध्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी, असिस्टंट कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी, भारत सरकार, नगर भूमापन, अपर तहसीलदार यांच्या आदेशाला भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक यांच्या न्यायालयात आव्हान दिले होते.
निर्णयाचे रेकॉर्ड मागविणार...
शत्रू संपत्तीबाबत असा काही निर्णय झाला आहे हे माहितीच नाही. भूमी अभिलेख विभागाकडून या प्रकरणातील सर्व रेकॉर्ड मागविण्यात येतील.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी.
सर्व तपासून निर्णय दिला
या प्रकरणात आमच्या अधिकाऱ्यांनी काही चुकीचे निर्णय घेतले होते. त्याबाबत माझ्याकडे सुनावणी झाली, यावर कागदपत्रांच्या आधारे निर्णय दिला आहे. ज्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार आहे, ते चुकीची माहिती पसरवत आहेत.
- डॉ. विजय वीर, अधीक्षक, भूमी अभिलेख