जालना रोडवर ६० मीटरमधील अतिक्रमणधारकाकडून स्वत:हून सामान काढून घेणे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:20 IST2025-06-26T19:19:17+5:302025-06-26T19:20:10+5:30
मनपाकडून मार्किंग आणि तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत, शनिवारी,रविवारी पाडापाडी

जालना रोडवर ६० मीटरमधील अतिक्रमणधारकाकडून स्वत:हून सामान काढून घेणे सुरू
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर ६० मीटरमधील अतिक्रमणधारक स्वत:हून आपल्या मालमत्ता काढून घेत आहेत. त्यामुळे महापालिका, पोलिस गुरुवारीही कारवाई करणार नाहीत. मालमत्ताधारकांना मार्किंग करून देणे, तोंडी सूचना देण्याचे काम मनपाकडून करण्यात येईल. मालमत्ताधारकांनी जेवढा वेळ मागितला होता, तेवढा देण्यात आला. शनिवारी आणि रविवारी मात्र कारवाई करण्यात येणार आहे.
जालना रोडवर मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत रस्ता ६० मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवार २० जून रोजी महापालिका, पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. २२९ अतिक्रमणे एका दिवसात पाडण्यात आली. अचानक केलेल्या कारवाईत अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी, बुधवारी अनेक मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. काही मालमत्ताधारकांनी एक ते दोन दिवसांचा वेळ मागितला. महापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना वेळही दिला.
अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले की, गुरुवारी, शुक्रवारी मनपा जालना रोडवर कोणतीही कारवाई करणार नाही. दिवसभर मालमत्ताधारकांना मार्किंग करून दिली जाईल. भोंगे लावून स्वत: मालमत्ता काढून घ्याव्यात, अशी सूचना केली जाणार आहे. शनिवार, रविवारी उर्वरित मालमत्ता काढून घेण्याचे काम मनपा करणार आहे.
स्वत: सामान काढून घेणे सुरू
मुकुंदवाडी, चिकलठाणा, संजयनगर इ. भागांतील मालमत्ताधारकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. मंगळवारी रात्रीपासूनच अनेक व्यापाऱ्यांनी आपले सामान हलविण्यास सुरुवात केली. महागडे सामान कारवाईत खराब होईल, मोठे नुकसान होईल, या भीतीपोटी ३०० पेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी सामान काढून घेणे सुरू केले. बुधवारी दिवसभर या भागात अतिक्रमणे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू होती.