अतिक्रमण पाडले,आता २०० फुट रुंद रस्त्यांसाठी NHAकडे मनपा करणार १ हजार कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:06 IST2025-07-05T18:04:20+5:302025-07-05T18:06:44+5:30

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Encroachments demolished, now the Municipal Corporation will demand Rs 1,000 crore from the National Highway for 200 feet wide roads | अतिक्रमण पाडले,आता २०० फुट रुंद रस्त्यांसाठी NHAकडे मनपा करणार १ हजार कोटींची मागणी

अतिक्रमण पाडले,आता २०० फुट रुंद रस्त्यांसाठी NHAकडे मनपा करणार १ हजार कोटींची मागणी

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने शहरातील प्रमुख ४ रस्ते २०० फूट रुंद केले. सर्व्हिस रोडसाठी महापालिकेकडे निधी नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७ जुलै रोजी दिल्लीत भेटीसाठी वेळ दिला आहे. यावेळी मनपा अधिकारी रुंद रस्त्यांचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) करणार आहेत. एक हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी रस्त्यांसाठी करण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्थानिक अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

शेंद्रा एमआयडीसी, बिडकीन डीएमआयसी भागात भविष्यात अनेक नवीन उद्योग येतील. त्याचप्रमाणे पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. शहरातील मुख्य चार रस्ते अत्यंत सुंदर आणि पुरेसे रूंद असावेत, अशी महापालिकेची भूमिका आहे. त्यादृष्टीने मागील महिनाभरात बीड बायपास, जालना रोड, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा रोड ३०० फूट रुंद करण्यात आले. या चारही रस्त्यांवर सर्व्हिस रोड करायचा म्हटले तर निधी खूप लागणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने थोडासा हातभार लावला तर रस्ते होतील.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना यश मिळत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७ जुलै रोजी मनपा अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले आहे. अतिरिक्त शहर अभियंता (विशेष प्रकल्प) ए. बी. देशमुख यांना दिल्ली येथील बैठकीत सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्याची सूचना प्रशासकांनी केली आहे. यावेळी मनपाकडून १ हजार कोटींची मागणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

५० किमीचे चार सर्व्हिस रोड
रस्ता--------------------------अंतर किमी-------सर्व्हिस रोड किमी

मुकुंदवाडी ते केम्ब्रिज--------६------------------१२
महानुभव आश्रम ते देवळाई--७------------------१४
महानुभव आश्रम ते गेवराई---५.९---------------१२
पडेगाव ते दौलताबाद टी पॉईंट---६.३-------------१२

Web Title: Encroachments demolished, now the Municipal Corporation will demand Rs 1,000 crore from the National Highway for 200 feet wide roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.