छत्रपती संभाजीनगरातील एन्काउंटर, तपासाची सूत्रे सीआयडीच्या हाती; १ तास चालला पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:20 IST2025-05-29T12:19:35+5:302025-05-29T12:20:38+5:30

सीआयडीच्या पथकाने सहायक निरीक्षक रवी गच्चे यांच्याकडून समजून घेतला एन्काऊंटरचा घटनाक्रम

Encounter in Chhatrapati Sambhajinagar, investigation in hands of CID; 1 hour panchnama, hotel sealed | छत्रपती संभाजीनगरातील एन्काउंटर, तपासाची सूत्रे सीआयडीच्या हाती; १ तास चालला पंचनामा

छत्रपती संभाजीनगरातील एन्काउंटर, तपासाची सूत्रे सीआयडीच्या हाती; १ तास चालला पंचनामा

छत्रपती संभाजीनगर / वाळूज : बजाजनगरमध्ये आर. एल. सेक्टरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर टाकलेल्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल बाबूराव खोतकर (वय ३४, रा. पडेगाव) याच्या सोमवारी मध्यरात्रीच्या एन्काऊंटरने, शहरासह गुन्हेगारी जग हादरवून गेले आहे. मंगळवारी सायंकाळीच यातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदविल्यानंतर सीआयडीने एफआयआरसह महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. तसेच तपासाची सूत्रे हाती घेतली. बुधवारी जवळपास एक तास त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून हॉटेलही सील केले.

१५ मे रोजी लड्डा यांच्या बंगल्यात मध्यरात्री दोन ते चार वाजेदरम्यान सहा सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. साडेपाच किलो सोन्याचे दागिने, ३२ किलो चांदी, ७० हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाइल लुटला होता. गुन्हे शाखा व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जवळपास अकरा दिवस तपास करून अमोलसह याेगेश सुभाष हाजबे (३१, रा. वडगाव कोल्हाटी), सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबीरोद्दीन (३७, रा. रांजणगाव शेणपुंजी), महेंद्र माधव बिडवे (३८, रा. साजापूर), सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (४५, रा. अंबाजोगाई), सोहेल जलील शेख (२२, रा. अंबाजोगाई) यांना निष्पन्न केले. अमोलच्या एन्काऊंटरच्या दोन दिवस आधीच अन्य पाचही दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात होते. सोमवारी मध्यरात्री अमोल साजापूर येथील साई लाॅजिंग येथे आल्याचे कळताच पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमोलने पोलिसांवर गोळी झाडली. या चकमकीत पोलिसांनी झाडलेल्या गोळीत त्याचा मृत्यू झाला.

दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार
अमोलला जाणीवपूर्वक मारल्याचा आरोप करीत कुटुंबाने पोलिसांच्या एन्काऊंटरवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंगळवारी रात्री उशिरा पोलिस बंदोबस्तात त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बुधवारी कुटुंबाने त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी १२ वाजता पोलिस बंदोबस्तात मिटमिटा परिसरात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एक तास चालला सीआयडीचा पंचनामा
बुधवारी दुपारी १२ वाजता सीआयडीचे एक अधिकारी व पाच कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जवळपास एक तास त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शिवाय, अमोल व याेगेश चालवीत असलेले हॉटेलदेखील सील केले.

गच्चे यांच्याकडून समजून घेतला घटनाक्रम
गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रवी गच्चे यांनी त्यांच्या शासकीय पिस्तुलातून एन्काऊंटर केले. बुधवारी पंचनाम्यादरम्यान सीआयडीच्या पथकाने त्यांच्याकडून सर्व घटनाक्रम समजून घेत नोंदी केल्या. अमोल नेमका कुठे होता, कार कुठल्या दिशेला उभी होती, पोलिसांनी कुठून थांबण्याचा इशारा केला, गोळी किती अंतरावरून झाडली गेली, या सर्व प्रश्नांची उत्तरे सीआयडीने गच्चे यांच्याकडून घेतली. दरम्यान, अमोलने पथकावर कार घातल्यानंतर अंमलदार मनोहर गिते यांच्या पायाला इजा झाली होती. बुधवारी त्यांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली.

Web Title: Encounter in Chhatrapati Sambhajinagar, investigation in hands of CID; 1 hour panchnama, hotel sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.