बांधकाम कमिटीच्या हाती रिकाम्या तिजोरीच्या चाव्या !
By Admin | Updated: December 5, 2014 00:52 IST2014-12-05T00:46:20+5:302014-12-05T00:52:31+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत दरवर्षी विविध प्रकारच्या कामावर जवळपास २० कोटी रुपये खर्च होतात

बांधकाम कमिटीच्या हाती रिकाम्या तिजोरीच्या चाव्या !
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत दरवर्षी विविध प्रकारच्या कामावर जवळपास २० कोटी रुपये खर्च होतात. सर्वाधिक निधी असलेला विभाग म्हणून या खात्याकडे पाहिले जाते. त्यामुळे बांधकाम समितीवर वर्णी लागावी म्हणून सदस्यांमध्ये चढाओढ असते. मात्र चालू आर्थिक वर्षातील निधीचे नियोजन करुन तत्कालीन समितीने कामांना मंजुऱ्याही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यमान समिती पदाधिकाऱ्यांच्या हद्दीत संबंधित कामांचा आढावा घेण्याखेरीज काहीच उरलेले नाही. सध्यातरी समिती पदाधिकाऱ्यांच्या हाती रिकाम्या तिजोरीच्या चाव्या आहेत.
जिल्हा परिषदेत आलेल्या बहुतांश सदस्यांचे लक्ष बांधकाम खात्याकडे असते. सर्वसाधारण सभेतही याच विभागाबाबत अधिकतर चर्चा होते. त्याला कारणही तसेच आहे. कारण या विभागाच्या माध्यमातून वर्षभरात जवळपास २० कोटी रुपये इतका निधी खर्च होतो. या माध्यमातून तीर्थक्षेत्र, आरोग्य, पर्यटनस्थळ, रस्ते आदी कामे राबविले जातात. चालू वर्षातही या विभागाला १९ ते २० कोटीचा निधी मंजूर होता. माजी बांधकाम सभापती धनंजय सावंत यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या निधीच्या माध्यमातून कामांचे नियोजन करुन त्याला मंजुऱ्याही दिल्या. यातील अनेक कामे पूर्ण झाली असून, काही प्रगतीपथावर आहेत. दरम्यान, असे असतानाच मागील दोन ते अडीच महिन्यापूर्वी बांधकाम समितीचे नव्याने गठन झाले आहे. बांधकाम सभापती म्हणून काँग्रेसचे सुधाकर गुंड यांची वर्णी लागली आहे. मात्र, विद्यमान समितीतील सदस्यांना निधीअभावी कामे सूचविण्यास अडचण येत आहे. कारण सध्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. ही परिस्थिती एप्रिल २०१५ पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे आगामी चार महिन्यांमध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या हाती जुन्या कमिटीने मंजूर केलेल्या कामांचा आढावा घेण्याखेरीज काहीही उरलेले नाही. त्यामुळे नव्याने समितीवर आलेल्या सदस्यांत नाराजी आहे. (प्रतिनिधी)४
एकीकडे कामे सुचविण्यास वाव नसताना दुसरीकडे मंजूर झालेली तब्बल ३९ कामे शासनाच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आली आहेत. यापैकी सर्वाधिक २७ कामे ही भूम आणि परंडा तालुक्यातील आहेत. तसेच वाशी तालुक्यातील ६, तुळजापूर ५ आणि उस्मानाबाद तालुक्यातील एका कामाचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.