नोकरदार अभियंता विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; आठ महिन्यापूर्वी झाला होता विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 18:33 IST2021-10-23T18:33:17+5:302021-10-23T18:33:47+5:30
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मेघना हिचा अंकुश सूर्यवंशी याच्यासोबत १६ फेब्रुवारी २०२१ रोजी विवाह झाला होता.

नोकरदार अभियंता विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; आठ महिन्यापूर्वी झाला होता विवाह
औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरीला असलेल्या अभियंता विवाहितेने पदमपुरा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुुमारास घडली. या तरुणीचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मेघना अंकुश सूर्यवंशी (२३) असे विवाहितेचे नाव आहे.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मेघना हिचा अंकुश सूर्यवंशी याच्यासोबत १६ फेब्रुवारी २०२१ रोजी विवाह झाला होता. अंकुश हा वाळूज एमआयडीसीत एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनअर म्हणून नोकरीला आहे. लग्नानंतर काही दिवसातच या दाम्प्त्यामध्ये वाद सुरु झाले. अकुंशचे कंपनीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मेघना यांना मिळाली होती. गुरूवारी रात्री ७ वाजता अंकुश सूर्यवंशी घरी आला तेव्हा त्यास मेघना यांनी सिलिंग फॅनला साडीने गळफास घेतल्याचे दिसले. घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शुक्रवारी सकाळी मेघना यांचे नातेवाईक घाटी रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश हा पत्नीशी व्यवस्थित वागत नव्हता. त्याचे कंपनीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, असा आरोप केला. या संबंधाची कुणकुण मेघना यांना लागल्यानंतर त्यांनी नवऱ्याचा मोबाईल तपासला तेव्हा त्यामध्ये संबंधित मुलीसोबत चॅटिंग केल्याचे आढळले होते. याबाबत मेघनाने तिच्या आईला देखील सांगितल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले.
माहेरी होणार अंत्यसंस्कार
मृत विवाहितेवर बीड जिल्ह्यातील माहेरी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पतीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह थेट वेदांतनगर पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास वरिष्ठ निरीक्षक गणपत दराडे यांनी नातेवाईकांना समजावून सांगितले. पतीवर तपास दरम्यान गुन्हा नोंदविण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन गेले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार ए.एच. अहिरे करीत आहेत.