एम्ब्रॅकोचा शेंद्र्यात १ हजार कोटींचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प मराठवाड्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:37 IST2025-06-09T16:37:02+5:302025-06-09T16:37:31+5:30

दरवर्षी ६० लाख कॉम्प्रेसर उत्पादनाचे लक्ष्य; २०२६ पर्यंत उत्पादनात, थेट १ हजार रोजगार मिळणार

Embraco's Rs 1,000 crore compressor project in Shendra will be a turning point for Marathwada | एम्ब्रॅकोचा शेंद्र्यात १ हजार कोटींचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प मराठवाड्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार

एम्ब्रॅकोचा शेंद्र्यात १ हजार कोटींचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प मराठवाड्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार

छत्रपती संभाजीनगर : जागतिक रेफ्रिजरेशन क्षेत्रातील आघाडीच्या 'एम्ब्रॅको' ('निदेक ग्लोबल अप्लायन्स' समूहाचा भाग) कंपनीने ऑरिक सिटीच्या शेंद्रा इंडस्ट्रीयल झोनमध्ये तब्बल १ हजार २९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. कंपनी येथे अत्याधुनिक कॉम्प्रेसर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. २०२६ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची कंपनीची योजना आहे. ७५० ते १००० जणांना थेट रोजगार मिळणार असल्याची घोषणा कंपनीने केली.

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर (डीएमआयसी)मध्ये गतवर्षीपासून विविध बहुराष्ट्रीय कंपन्या दाखल होत आहेत. गतवर्षी ५४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प येथे येत आहेत. आता येथील औद्याेगिक विश्वाला नवे बळ देणाऱ्या एम्ब्रॅको कंपनीने १ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. ऑरिक शेंद्रा येथे कंपनी ५० एकरवर हा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून दरवर्षी ६० लाख कॉम्प्रेसर युनिट्सचे उत्पादन करण्याचा कंपनीचा मानस आहे. घरगुती, तसेच व्यावसायिक फ्रीजसाठी हे युनिटस् असतील. त्यासोबत ऊर्जा कार्यक्षम इन्व्हर्टरचेही उत्पादन येथे होईल.

दीड महिन्यांपूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहिली जमीन
कंपनीचे अधिकारी दीड महिन्यापूर्वी शहरात आले होते. त्यांनी शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीला भेट दिली. ऑरिक शेंद्रा येथील ५० एकरचा भूखंड दाखविण्यात आला. आता या भूखंडावर प्रकल्प उभारण्याची घोषणा केली.

मराठवाड्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणारा प्रकल्प
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या बिडकीन इंडस्ट्रीयल झोनमध्ये टोयोटा-किर्लोस्कर मोटार्स, जेएसडब्ल्यू, एथर एनर्जी, ल्युब्रिझोल यासह पिरॅमल फार्मा या कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. शिवाय वाळूज इंडस्ट्री ऑटो हब म्हणून ओळखली जाते. जालना येथे सीड आणि स्टील इंडस्ट्रीज चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. आता एम्ब्रॅको कंपनी काँप्रेसरचा प्रकल्प उभारत असल्याने शहर जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. या प्रकल्पामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नव्याने मोठ्या संधी उपलब्ध होतील.
- उत्सव माछर, उपाध्यक्ष सीएमआयए

Web Title: Embraco's Rs 1,000 crore compressor project in Shendra will be a turning point for Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.