सुख- दुःखाचे साथीदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 16:38 IST2020-11-28T16:37:38+5:302020-11-28T16:38:46+5:30
घरातील आधारवड दोन्ही वृद्धांचे निधन झाल्यामुळे कुटुंबातील सदस्य दु:ख सागरात बुडाले.

सुख- दुःखाचे साथीदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप
वाळूज महानगर : एका वृद्ध दाम्पत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतल्याची दु:खद घटना काल गुरुवारी (दि.२६) वाळूजला घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूजच्या मनीषानगर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या गंगूबाई कचरू भावसार (७७) यांचे गुरुवारी (दि.२६) राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले होते. गंगूबाई यांचे निधन झाल्यामुळे नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. दरम्यान, जीवनात सुख-दु:खाची साथीदार असलेल्या पत्नी गंगूबाईचे निधन झाल्याचे समजताच पती कचरू भावसार यांना धक्का बसला. अर्धांगिनीचा विरह सहन न झाल्याने दीड तासातच कचरू भावसार (८३) यांनीही जगाचा निरोप घेतला. घरातील आधारवड दोन्ही वृद्धांचे निधन झाल्यामुळे कुटुंबातील सदस्य दु:ख सागरात बुडाले. रात्री उशिरा या दाम्पत्यावर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.