विद्यापीठाकडे परीक्षा अर्जच पोहचले नाहीत; आठ हजार ८४८ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:11 IST2024-12-18T12:09:57+5:302024-12-18T12:11:00+5:30
विद्यापीठ : महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज दाखल केले नसल्याचा दावा; विद्यार्थी, पालकांची धांदल

विद्यापीठाकडे परीक्षा अर्जच पोहचले नाहीत; आठ हजार ८४८ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून चार जिल्ह्यांत सुरुवात झाली. या परीक्षेसाठी ८४ हजार १८३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील परीक्षेला सुरुवात होईपर्यंत ७५ हजार ४९२ विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जनरेट करण्यात आले. अनेकांना विना हॉलतिकीट नंबरवर परीक्षा देण्याची मुभा दिली. त्याच वेळी आठ हजार ८४८ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पोहोचले नसल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना चार जिल्ह्यांतील २६८ होम सेंटरवर मंगळवारपासून सुरुवात झाली. पदवीच्या १८ अभ्यासक्रमांना ८४ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यातील ८४ हजार १८३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यातील ७५ हजार ४९२ विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट परीक्षा विभागाने परीक्षेला सुरुवात होण्याच्या मिनिटापर्यंत ऑनलाइन जनरेट केले. उर्वरित आठ हजार ८४८ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पोहोचले नसल्यामुळे संबंधितांचे हॉलतिकीट बनले नाहीत. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षाही देता आली नसल्याची धक्कादायक माहिती आहे. हा प्रकार परीक्षा विभागासह महाविद्यालयांची दिरंगाई आणि बेपर्वाईमुळे घडल्याचे महाविद्यालयातील प्राध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
हॉलतिकीट ऐवजी मिळाले नंबर
विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होईपर्यंत अनेक केंद्रांवर हॉलतिकीट मिळालेच नव्हते. त्याचवेळी परीक्षा विभागाने या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट ऑनलाइन जनरेट करीत महाविद्यालयांच्या लाॅगिनमध्ये पाठविण्यात आले. मात्र, परीक्षेला सुरुवात होईपर्यंत हे हॉलतिकीट डाऊनलोड झालेच नव्हते. त्यामुळे परीक्षा विभागाने दिलेल्या परीक्षा क्रमांकावर ऐनवेळी परीक्षा घेण्यात आली. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पोहोचले नाहीत. त्या विद्यार्थ्यांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले.
१२३ विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षेपासून रोखले
बी.एस्सी संगणकशास्त्र या विषयात प्रथम सत्राची परीक्षा देणाऱ्या १२३ विद्यार्थ्यांना ऐनवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील केंद्रावर परीक्षेपासून रोखल्याचा प्रकार घडला. या विद्यार्थ्यांची तातडीने पर्यायी व्यवस्था करून होम सेंटरवर परीक्षा घेतल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली. तसेच या महाविद्यालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, चौकशी समिती नेमणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्ज प्राप्त विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट दिले
पदवी प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या तरी महाविद्यालयांकडून आठ हजार ८४८ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विद्यापीठ परीक्षा विभागाकडे दाखल झाले नाहीत. १५ डिसेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले, त्या सर्व विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट दिले असून, ते परीक्षा देत आहेत.
-डॉ. भारती गवळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ