छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर नशा करणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सिटी चौक पाेलिसांना गांजा, एमडी ड्रग्जचे सेवन करून विकणारा सूरज जगन्नाथ तिवारी (३१, रा. कैलासनगर) हा रंगेहाथ हाती लागला. विशेष म्हणजे, ८७२ ग्रॅम गांजा, ७ ग्रॅम एमडी पावडर, रसायनाद्वारे सेवन करण्यासाठी १७ इंजेक्शन व धारदार तलवारीसह तो मैदानावर नशा करत होता. न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाजवळील शेतकी भवनजवळ अनेक दिवसांपासून नशेखोरांनी ठिय्या मांडला होता. सिटी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अजित दगडखैर, संजय राठोड यांनी मंगळवारी मध्यरात्री पथकासह मैदानाकडे धाव घेतली. शेतकी भवनजवळ ड्रग्ज पावडर, गांजासह थांबलेला सूरज रंगेहाथ सापडला. त्याच्याकडे आढळलेला अमली पदार्थांचा साठा जप्त करून त्याला अटक करण्यात आली. सहायक फौजदार मुनीर पठाण, बबन इप्पर, आनंद वाहूळ, मनोहर त्रिभुवन, दयानंद स्वामी, निशा जाधव यांनी ही कारवाई केली.
वडील सेवानिवृत्त, स्वत: बी. कॉम. उत्तीर्णबी.कॉम उत्तीर्ण असलेला सूरज चुकीच्या संगतीमुळे नशेच्या आहारी गेला. परिणामी, त्याची पत्नीही त्याला सोडून गेली. त्याचे वडील शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. एमडी ड्रग्ज, गांजाच्या सेवनासोबतच त्याने नंतर विक्री देखील सुरू केली. यातून त्याने घरातील आई वडिलांचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याचे तपासात समजल्याचे पोलिसांनी सांगितले. पहिल्यांदाच तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे. त्याला ड्रग्ज पुरवणाऱ्यांचा शोध आता सिटी चौक पाेलिस घेत आहेत.