आर्थिकस्थिती ढासळली; नैराश्यातून पत्नीचा गळा आवळून खून करुन पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 20:00 IST2021-05-11T19:56:33+5:302021-05-11T20:00:27+5:30
Husband commits suicide after killing his wife in economic depression मुलीच्या लग्नानंतर त्यांची अर्थिक परिस्थिती खुपच बिघडली होती.

आर्थिकस्थिती ढासळली; नैराश्यातून पत्नीचा गळा आवळून खून करुन पतीची आत्महत्या
फुलंब्री : सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे आर्थिक तंगीतून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. वंदना ज्ञानेश्वर भोकरे(३५) व ज्ञानेश्वर विठ्ठल भोकरे(४०) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी मयत ज्ञानेश्वर भोकरेवर वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडोदबाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर भोकरे व वंदना भोकरे या दाम्पत्याला तीन मुली व एक मुलगा आहे. यातील मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे. त्यांच्याकडे केवळ सव्वा एकर शेती असून यावर उपजीविका भागत नव्हती. मुलीच्या लग्नानंतर त्यांची अर्थिक परिस्थिती खुपच बिघडली होती. त्यातच ज्ञानेश्वर भोकरे यांनी पत्नीच्या नावे कर्ज घेतले होते. यावरुनही दोघांत वाद होत होता. त्यातूनच ज्ञानेश्वर भोकरे यांनी टोकाचे पाऊल उचलले.
सोमवारी रात्री मुलगा व मुलगी झोपल्यानंतर १२ वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर भोकरे यांनी पत्नी वंदना भोकरे हिचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पाच तास घरीच थांबल्यानंतर पहाटे ५ वाजता उपसरपंच विश्वास दाभाडे यांच्या घरी जाऊन सर्व हकीकत सांगितली असता विश्वास दाभाडे यांनी त्याची समजूत घातली व महिलेच्या नातेवाईकांना माहिती दिली व ते घरी अंघोळीसाठी गेले असता ज्ञानेश्वर याने दीड किमी अंतरावर असलेल्या संपत कृष्णा दाभाडे यांच्या मळ्यातील नाल्याजवळ असलेल्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला
या घटनेची माहिती मिळताच वडोदबाजार पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव ,बीट जमादार दत्ता मोरे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोन्ही मयताचे शव सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले शवविच्छेदन केल्या नंतर दोघांवर कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मयत वंदना भोकरे यांचे वडील गोरक्षनाथ सुस्ते यांच्या फिर्यादी वरून मयत ज्ञानेश्वर भोकरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे