‘खोदा पहाड और निकाला बैल’; अग्निशमन दलाला सात तासाने आले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 19:23 IST2018-11-29T19:21:31+5:302018-11-29T19:23:18+5:30
अग्निशामक दलाच्या जवानांनी ७ तास प्रयत्न करून डोंगरकडा खोदून खदानीत अडकलेला बैल सुखरूप बाहेर काढला.

‘खोदा पहाड और निकाला बैल’; अग्निशमन दलाला सात तासाने आले यश
औरंगाबाद : देवळाईच्या डोंगररांगेतील साई टेकडीनजीक उंचावर चरणारा बैल अचानक घसरत शंभर फूट खोल खदानीत पडला अन् अडकला. ही खदान डोंगराच्या मध्यभागी असल्याने बैलास वरच्या बाजूने ओढणे अशक्य होते, तर खाली पुन्हा दुसरी दरी होती. शेवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी ७ तास प्रयत्न करून डोंगरकडा खोदून खदानीत अडकलेला बैल सुखरूप बाहेर काढला.
आग लागली, पाण्यात पडले, झाड पडले किंवा आपत्कालीनप्रसंगी अग्निशामक दलाच्या जवानांची नागरिकांना आवर्जून आठवण होते. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अग्निशामक दलाला एक कॉल गेला अन् त्यांनी सांगितले की, डोंगरावरील खदानीत एक बैल पडला असून, तो जिवंत आहे. त्याला काढता येत नाही. अग्निशामक दलाची गाडी डोंगराच्या दिशेने घंटी व सायरन वाजवीत निघाली. देवळाई परिसरातील नागरिकांना काहीच कळेना. सकाळची वेळ होती. नक्की कुठे आग लागली असेल, असा अनेकांना प्रश्न पडला.
गाडीपाठोपाठ काही नागरिक व बाळगोपाळांनीदेखील धाव घेतली, तेव्हा खदानीत पडलेला एक बैल बाहेर पडण्यासाठी धडपडत होता. उंच डोंगरावर तो बैल चरत होता. तो अचानक तोल जाऊन १०० फूट खोल दरीत कोसळला. त्याला वर निघण्यासाठी कोणताही मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे प्रा. सुभाष फासे यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले होते.
खदानीच्या उजव्या बाजूला खोदकाम
खदानीत पडलेल्या त्या बैलाला कसे वाचवावे, असा प्रश्न अग्निशामक दलालाही पडला. सिडी लावता येत नव्हती. दोर लावून ओढणेही शक्य नव्हते. ज्या खदानीत बैल पडला त्या बाजूला उभे राहणेदेखील शक्य नव्हते. डोंगरावर खदानीच्या बाजूला खोदून कमी उंचीच्या बाजूने बैलाला दोराच्या साहाय्याने ओडून काढले. मात्र, यासाठी सात तासांहून अधिक वेळ लागला. खदानीतून त्या बैलाला काढताना आग्निशामक विभागाचे पथकप्रमुख विजय राठोड, श्रीकृष्ण घोडके, अब्दुल हमीद, मोहंमद मुजफर, कुलकर्णी आदींसह स्थानिक नागरिक प्रा. सुभाष फासे व इतरांनी मदत केली.