नोकरभरती शुल्कामुळे जिल्हा परिषदेचा वाढला तब्बल पावणेदोन कोटींचा गल्ला
By विजय सरवदे | Updated: September 8, 2023 20:51 IST2023-09-08T20:51:29+5:302023-09-08T20:51:49+5:30
४३२ पदांसाठी साडेअठरा हजार उमेदवार स्पर्धेत

नोकरभरती शुल्कामुळे जिल्हा परिषदेचा वाढला तब्बल पावणेदोन कोटींचा गल्ला
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेत विविध संवर्गाच्या ४३२ रिक्त पदांसाठी भरती होणार असून त्यासाठी गेल्या महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार तब्बल १८ हजार ४८२ एवढे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. तथापि, परीक्षा शुल्कापोटी जिल्हा परिषदेच्या खात्यात १ कोटी ६८ लाख ८९ हजार ७०० रुपये जमा झाले आहेत.
पदभरतीची परीक्षा ‘आयबीपीएस’ या खासगी संस्थेमार्फत घेतली जाणार असून साधारण ३ ऑक्टोबरपासून या परीक्षांना सुरुवात होईल, असा अंदाज आहे. जिल्हा परिषदेतील पदभरतीची जाहिरात ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली. त्यानुसार परीक्षा अर्ज व शुल्क भरण्याची मुदत ५ ते २५ ऑगस्टपर्यंत होती. या कालावधीत ४३२ रिक्त पदांसाठी सुमारे साडेअठरा हजार अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले. या सर्वच संवर्गाच्या पदांकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून १ हजार रुपये, तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले. यामाध्यमातून १ कोटी ६८ लाख ८९ हजार ७०० रुपये जि.प.च्या तिजोरीत जमा झाले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेध लागले आहेत. तथापि, ३ ऑक्टोबरपासून या परीक्षेला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
‘त्या’ उमेदवारांना शुल्क परतावा कधी?
सन २०१९-२० मध्ये जि.प. मधील पदभरतीसाठी अर्ज केले होते. मात्र, एनकेन कारणाने पदभरतीची ती परीक्षाच झाली नाही. अशा उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय झाला असून जिल्हा परिषदेकडे ६५ टक्के अर्थात ९० लाख ७९ हजार ३८ रुपये शुल्काची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली. उर्वरित ३५ टक्के रक्कम प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना ती परत केली जाणार आहे. यासाठी एकूण परीक्षा शुल्क १ कोटी ३९ लाख ६७ हजार ३५० रुपये प्राप्त झाले होते.
पदनाम- रिक्तपदे- प्राप्त अर्ज
आरोग्यसेवक (पुरुष) ५- १३६०
आरोग्यसेवक (पुरुष- फवारणी) ५७- १९७५
आरोग्य परिचारिका २४४- १६३१
औषध निर्माण अधिकारी ९- १७६१
कंत्राटी ग्रामसेवक १५- २२३३
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४१- २८०७
कनिष्ठ सहायक (लिपिक) १८- २०७३
कनिष्ठ सहायक (लेखा) ४- २२६
वरिष्ठ सहायक (लेखा) १- ८४
वरिष्ठ सहायक (लिपिक) १- २८४
पशुधन पर्यवेक्षक १३- ३२४
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १- १४७
विस्तार अधिकारी (कृषि) १- २२६
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक १२- ११२२
पर्यवेक्षिका ९- २१४७
लघुलेखक (उच्चश्रेणी) १- ८५