निष्काळजीपणा भोवला, ४६ महाविद्यालयांनी भरले परीक्षेच्या दिवशी ७,६७५ अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:40 IST2025-11-26T17:36:01+5:302025-11-26T17:40:02+5:30
परीक्षा विभाग करणार प्राचार्यांवर दंडात्मक कारवाई

निष्काळजीपणा भोवला, ४६ महाविद्यालयांनी भरले परीक्षेच्या दिवशी ७,६७५ अर्ज
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला ऐनवेळी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, या परीक्षा संलग्न ४७४ महाविद्यालयांपैकी तब्बल ४६ महाविद्यालयांनी परीक्षेच्या एक दिवस आगोदर आणि परीक्षेच्या दिवशी तब्बल ७ हजार ६७५ परीक्षेचे अर्ज दाखल केल्यामुळे लांबवाव्या लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महाविद्यालयांवर परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती परीक्षा विभागातर्फे देण्यात आली.
विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १२ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात पदवीच्या जुन्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना होत आहे. १८ नोव्हेंबरपासून पदवीच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ होणार होता. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १७ नोव्हेंबरच्या रात्री नवीन अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात विद्यार्थ्यांसह विविध प्राधिकरणांच्या सदस्यांनीही संताप व्यक्त केला. परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण आता पुढे आले असून, संलग्न ४६ महाविद्यालयांनी तब्बल ७ हजार ६७५ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज परीक्षेच्या दिवशी आणि पूर्वसंध्येला परीक्षा विभागामध्ये दाखल केले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे हॉलतिकिटांसह इतर प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा २९ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज वेळेवर सादर करण्यास दिरंगाई केली. त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय परीक्षा विभागाच्या मंडळात घेण्यात येणार असल्याचेही परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
परीक्षेपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे अशक्य
नवीन अभ्यासक्रमांच्या पदवी परीक्षांना सुरुवात होण्याच्या दिवसांपर्यंत अतिविलंब शुल्क भरून मोठ्या संख्येने अर्ज दाखल प्राप्त झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणे योग्य नव्हते. त्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तरीही संपूर्ण परीक्षा डिसेंबर महिना संपण्यापूर्वीच घेण्यात येतील.
- डॉ. बी. एन. डोळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ