दुष्काळामुळे शेतकऱ्याची ४०० झाडांच्या मोसंबीच्या बागेवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:41 IST2019-05-09T19:38:50+5:302019-05-09T19:41:58+5:30
वाळलेल्या मोसंबीच्या झाडांवर शेतकऱ्याने जड अंत:करणाने कुऱ्हाड उचलली.

दुष्काळामुळे शेतकऱ्याची ४०० झाडांच्या मोसंबीच्या बागेवर कुऱ्हाड
पिंप्रीराजा (औरंगाबाद ) : मलकापूर गावातील शेतकरी तीव्र दुष्काळी परिस्थितीत झाडांना पाणीपुरवठा करू शकत नाही, त्यामुळे उभी बाग वाळली. वाळलेल्या मोसंबीच्या झाडांवर शेतकऱ्याने जड अंत:करणाने कुऱ्हाड उचलली.
कृष्णा डोक यांची मलकापूर शिवारात शेती आहे, येथील गटनंबर १५ मध्ये त्यांची ४०० झाडांची मोसंबीची बाग होती. यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे मराठवाड्यात तीव्र दुष्काळ पडला आहे, तापमानानेसुद्धा उच्चांक गाठल्याने एप्रिल महिन्यातच तापमान ४४ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले. सूर्य आग ओकू लागला, तर विहिरीने तळ गाठला, अशा परिस्थितीत शेतकरी कृष्णा डोक यांनी हिंमत हरली नाही. त्यांनी पाणी विकत घेऊन मोसंबी जगवायचा प्रयत्न केला.
अखेर टँकरचा खर्चही पेलवणे डोईजड झाले, उसनवारी करून बाग जगविण्याची हिंमत संपली. नशिबाने इथेही त्यांची क्रू र थट्टाच केली. एप्रिल संपता संपता टँकरनेसुद्धा पाणी मिळणे कठीण झाले, शेवटी या शेतकऱ्याने परिस्थितीसमोर गुडघे टेकले. डोळ्यादेखत मोसंबीची बाग पाहता पाहता वाळून गेली. ७०० झाडांवर कुºहाड चालविली असून, शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कृष्णा डोक यांनी केली आहे.