कोरडवाहू शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे, तर बागायतदारांनी सुरु केली विहिरीच्या पाण्यावर पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:25 IST2021-06-23T18:23:45+5:302021-06-23T18:25:55+5:30
१० जून नंतर पाऊस उघडल्यानंतर या शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे पूर्ण केली. त्यानंतर पेरणी करण्यासाठी पावसाची वाट बघू लागले आहेत.

कोरडवाहू शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे, तर बागायतदारांनी सुरु केली विहिरीच्या पाण्यावर पेरणी
- श्रीकांत पोफळे..
करमाड ( औरंगाबाद ) : चांगल्या सुरुवातीनंतर पावसाने खंड पाडला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतची कामे देखील करता आले नाही. ज्या शेतकऱ्यांनी मशागतीचे काम पूर्ण केले होते त्यांनी पेरणी करून घेतले. ज्या शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे ते पावसाची वाट बघून बघून आता विहिरीच्या पाण्यावर पेरणी करण्याचा धाडसी निर्णय घेत आहेत. परंतु, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसलेले कोरडवाहू शेतकरी पावसाची वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र आहे.
औरंगाबाद तालुक्यात मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी देखील खरिपाची पेरणी वेळेवरच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. मशागतीची कामे पूर्ण झाली अशा सर्व शेतकऱ्यांनी कपाशी, मका, तूर, सोयाबीन, मूग, उडीद या खरीप पिकांच्या लागवडी करण्यास सुरुवात केली. मात्र, मशागतीचे कामे पूर्ण झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांची सततच्या पावसामुळे जवळपास पंधरा दिवस कामे लांबली.
१० जून नंतर पाऊस उघडल्यानंतर या शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे पूर्ण केली. त्यानंतर पेरणी करण्यासाठी पावसाची वाट बघू लागले. जवळपास पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या. मात्र, आता पावसाची किती दिवस वाट बघायची पुढे चांगला पाऊस झाला तरी खरिपाची लागवड वेळेवर झाली नाही तर उत्पादनात घट होईल या विचाराने ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे त्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. पंरतु, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाही अशा कोरडवाहू शेतकऱ्यांवर आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघण्याची वेळ आली आहे.
दुबार पेरणीचे संकट
ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीला पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्याची गरज पडत आहे. त्यातील सर्वच शेतकऱ्यांकडे पाणी देण्याचे स्त्रोत किंवा पाणीच उपलब्ध नाही असे कोरडवाहू शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावणार अशी भीती निर्माण झालेली आहे.