जामिनावर सुटताच नशेच्या औषधांची पुन्हा तस्करी, १८० रुपयांची बाटली ४०० रुपयांत विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:47 IST2025-12-10T19:46:31+5:302025-12-10T19:47:10+5:30
पोलिसांना सापडत नसलेला गंभीर गुन्ह्यातील पसार गुन्हेगार अखिल मालक छत्रपती संभाजीनगरातच राहून चालवतोय रॅकेट

जामिनावर सुटताच नशेच्या औषधांची पुन्हा तस्करी, १८० रुपयांची बाटली ४०० रुपयांत विक्री
छत्रपती संभाजीनगर : रेकॉर्डवरील गुन्हेगाराने अमली पदार्थांच्या तस्करीच्या दोन गुन्ह्यात जामिनावर सुटताच बिनबाेभाट नशेसाठी सेवन केल्या जाणाऱ्या पातळ औषधांची विक्री सुरू केली. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (एएनसी) सोमवारी रात्री सापळा रचून यात सय्यद फिरोज सय्यद अकबर उर्फ अंधा फिरोज (३०, रा. चांदमारी, पडेगाव) व अयान शेख चांद शेख (१९, रा. वेदांतनगर) यांना अटक करत त्यांच्या ताब्यातून ३१ बाटल्या जप्त केल्या.
एएनसी पथकाकडून गतवर्षभरात अमली पदार्थांची विक्री व तस्करांवर १५० पेक्षा अधिक कारवाया केल्या. मात्र, स्थानिक पोलिसांकडून तपासच न झाल्याने जामिनावर सुटताच तस्कर पुन्हा सक्रिय होत आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार अंधा फिरोजने पुन्हा पातळ औषधांची विक्री सुरू केल्याची माहिती एएनसी पथकाचे सहायक निरीक्षक रवीकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी रात्री कर्णपुरा परिसरात सापळा रचला. फिरोजने येत पेडलर अयानला भेटताच सहायक अंमलदार लालखान पठाण, नवाब शेख, नितेश सुंदर्डे, सतीश जाधव यांनी त्यांना पकडले. तेव्हा, विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या पातळ औषधांच्या ३१ बाटल्या मिळून आल्या. त्यांना अटक करून छावणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अयानला प्रती बाॅटल ५० रुपये, फिरोज घेतो दोनशेत
फिरोजवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. एएनसी पथकाने काही महिन्यांपूर्वी त्याला दोन वेळा अटक केली होती. शेवटच्या गुन्ह्यांत २०० नशेच्या गोळ्यांसह अटक केली होती. त्यात तो जामिनावर सुटला. गोळ्यांची तस्करी अवघड जात असल्याने तो पातळ औषधांच्या तस्करीकडे वळला. त्याचा मित्र अयानला तो ग्राहकांना बाटली पोहोचवण्यासाठी प्रती बॉटल मागे ५० रुपये देतो. तर, २०० रुपयांत खरेदी करून नशेखोरांना ४०० रुपयांत विक्री करताे.
अखिल मालक पोलिसांना सापडत का नाही ?
फिरोज हा सर्व माल अखिल मालक नामक कुख्यात तस्कराकडून खरेदी करतो. अखिल यापूर्वी जवळपास पाच गुन्ह्यांत आरोपी असून, शहर पोलिसांना एकदाही मिळून आला नाही. तरीही तो शहरात राहून राजरोस अमली पदार्थांचे रॅकेट चालवतो. या सर्व औषधांचा साठा सुरतवरून आणत असल्याचे फिरोजने सांगितले.