मराठवाड्यात वाढती नशेखोरी; ८ महिन्यांत ४ जिल्ह्यांतून ७ कोटींचे अमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 19:24 IST2025-09-04T19:23:54+5:302025-09-04T19:24:22+5:30

चार जिल्ह्यांत १०२ तस्करांना अटक, धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२ तस्करांवर कायद्याचा बडगा

Drug abuse increasing in Marathwada; Drugs worth Rs 7 crore seized from 4 districts in 8 months | मराठवाड्यात वाढती नशेखोरी; ८ महिन्यांत ४ जिल्ह्यांतून ७ कोटींचे अमली पदार्थ जप्त

मराठवाड्यात वाढती नशेखोरी; ८ महिन्यांत ४ जिल्ह्यांतून ७ कोटींचे अमली पदार्थ जप्त

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात गांजाचे अधिक सेवन केले जात असून, आठ महिन्यांत छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), बीड, धाराशिव व जालन्यात ७ कोटी ३० लाख रुपयांचे अमली पदार्थ सापडले. विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी नशेखोरीविरोधात मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

अमली पदार्थांचे गेल्या सहा वर्षांत मोठे जाळे पसरले. यात प्रामुख्याने वेदनाशमक गोळ्यांची अवैध तस्करी करून दामदुप्पट दराने नशेसाठी विक्री सुरू झाली. यात शहरातील मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहारी गेला. मोठ्या शहरांमध्ये सेवन केले जाणारे एमडीसदृश्य महागडे ड्रग्जही आता छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात सहज उपलब्ध झाल्याने नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिश्र यांनी चारही जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना या नशेखोरीविरोधात विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याच्या कडक सूचना केल्या. त्यानंतर कारवायांसोबत १३१ शाळा, महाविद्यालयांत पोलिसांनी नशेखाेरीविरोधात जनजागृती केली.

१०२ तस्करांना अटक
जानेवारी ते ऑगस्ट यादरम्यान चार जिल्ह्यांत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांसोबतच सेवन प्रकरणात ७६ गुन्हे दाखल करून १०८ नशेखोरांवर कारवाई करण्यात आली. यात ६ अल्पवयीन निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस बजावण्यात आली. १०२ जणांना अटक करण्यात आली.

७ कोटींचा ऐवज जप्त
७ कोटी ३० लाखांचा अमली पदार्थांचा ऐवज जप्त करण्यात आला. यात प्रामुख्याने ११२९ किलो गांजा, गांजाची झाडे, ८३५ किलोग्रॅम अफू, ७३.०३ ग्रॅम एमडी ड्रग्ज तर शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, पातळ औषधांचा साठा जप्त करण्यात आला.

अमली पदार्थांची विक्री, सेवनाबाबत विशेष हेल्पलाइन
छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) - ९१७५७७७६४६
बीड - ९२७०२४३२००
धाराशिव - ८९९९८९०४९८
जालना -७८४३०५१०२६

चार जिल्ह्यांमध्ये धाराशिव पुढे
जिल्हा - गुन्हे/कारवाया - अटक तस्कर

धाराशिव - ३१ - ४२
बीड - १८ - १७
छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) - १५ - १२ (६ नोटीस)
जालना -११ -२५

प्रशिक्षित अधिकारी, अंमलदार नियुक्त
कारवायांसाठी जिल्हानिहाय एनडीपीएस पथक स्थापन केले असून त्यात प्रशिक्षित अधिकारी, अंमलदार नियुक्त केले. नागरिकांनी सदर क्रमांकावर पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
- वीरेंद्र मिश्र, विशेष पोलिस महानिरीक्षक.

Web Title: Drug abuse increasing in Marathwada; Drugs worth Rs 7 crore seized from 4 districts in 8 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.