दुष्काळी अंदाजपत्रके फुगताहेत
By Admin | Updated: April 30, 2016 00:07 IST2016-04-29T23:33:01+5:302016-04-30T00:07:37+5:30
औरंगाबाद : जलयुक्त शिवारअंतर्गत केल्या जाणाऱ्या दुष्काळी कामांची अंदाजपत्रके फुगवून होत असलेल्या खाबूगिरीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी शुक्रवारी प्रकाशझोत टाकला.

दुष्काळी अंदाजपत्रके फुगताहेत
औरंगाबाद : जलयुक्त शिवारअंतर्गत केल्या जाणाऱ्या दुष्काळी कामांची अंदाजपत्रके फुगवून होत असलेल्या खाबूगिरीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी शुक्रवारी प्रकाशझोत टाकला. सिमेंट बंधाऱ्यासाठी सरकारी यंत्रणेने ९० लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. स्टरलाईट समूहाने हेच काम अवघ्या साडेतेरा लाखांत केल्याचे भोगले यांनी स्पष्ट केले. योग्य वेळ येताच ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असे बागडे यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे (सीएमआयए) मराठवाड्यात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी मुंबईच्या ज्वेलेक्स समूहातर्फे ‘सीएमआयए’ला दहा लाखांची मदत देण्यात आली. ‘सीएमआयए’ कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ‘ज्वेलेक्स’चे होशंग इराणी आणि समीर रावल यांनी बागडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. भोगले, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे, उपाध्यक्ष गुरुप्रीतसिंग बग्गा, माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, आशिष पोकर्णा, अक्षय राठी, डॉ. सुनील देशपांडे, अतुल बनगीनवार आदी यावेळी उपस्थित होते.
दहा लाखांच्या निधीतून केलेल्या कामाचा हिशेब ‘ज्वेलेक्स’ला दिला जाईल, असे स्पष्ट करून भोगले म्हणाले की, भीषण दुष्काळातही सरकारी यंत्रणांकडून कामाची अंदाजपत्रके फुगविली जात आहेत. सरकारी यंत्रणेने बनविलेल्या ३६ कोटींच्या अंदाजपत्रकाचे काम उद्योजकांनी
अवघ्या साडेतेरा कोटींत करून दिले. औरंगाबाद जिल्ह्यातील ९० लाखांचा सिमेंट बंधारा स्टरलाईटने अवघ्या साडेतेरा लाखांत पूर्ण केला. ‘सीएमआयए’नेदेखील १३ लाखांचे अंदाजपत्रक असणारे एक काम साडेचार लाखांत करून दाखविले.
बागडे यांनीदेखील आपल्या भाषणात अंदाजपत्रके फुगविण्याचे प्रकार यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात सुरू असल्याबद्दल खंत व्यक्त केली. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या याबाबतीत मी काही बोलणार नाही; परंतु योग्य वेळ येताच ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल.
दुष्काळाच्या बातम्या
अस्वस्थ करीत होत्या
मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या बातम्या आम्हाला मुंबईतही अस्वस्थ करीत होत्या. दुष्काळ निवारणासाठी मदत केली पाहिजे, अशी आमची भावना झाली; परंतु मदत कोणाकडे करावी हे सूचत नव्हते. ‘सीएमआयए’ करीत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती आम्हाला मिळाली आणि मदत देण्याचा निर्णय घेतला, असे ‘ज्वेलेक्स’चे होशंग इराणी यांनी सांगितले.